भाऊ मला वाचवा, दादा मला वाचवा हो...! सर्वांसमोर १९ वर्षीय मुलावर काळाची झडप
By ब्रह्मानंद जाधव | Updated: June 9, 2023 19:10 IST2023-06-09T19:09:36+5:302023-06-09T19:10:05+5:30
ही हृदय हेलवणारी घटना मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील ९ जून रोजी दुपारी १ वाजताची.

भाऊ मला वाचवा, दादा मला वाचवा हो...! सर्वांसमोर १९ वर्षीय मुलावर काळाची झडप
बुलढाणा : दुपारचं प्रखर ऊन, त्यात 'भाऊ मला वाचवा..., दादा मला वाचवा...', असा केविलवाणा आवाज मदतीसाठी शेतशिवारात घुमत होता. त्या आवाजाच्या दिशेने परिसरातील अनेकजण जमा झाले. मृत्यूच्या दारात अवघ्या १९ वर्षीय मुलाची सुरू असलेली ही झुंज बघून जो तो केवळ थक्क होत होता.. पण कुणीही काहीच करू शकत नव्हते; जवळपास अर्धा तास अंगावर जेसीबी असलेल्या १९ वर्षीय मुलावर सर्वांच्या डोळ्यादेखत काळाने झडप घातली. ही हृदय हेलवणारी घटना मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील ९ जून रोजी दुपारी १ वाजताची.
ऊमरा देशमुख येथील अक्षय किसनराव देशमुख हा १९ वर्षीय मुलगा अत्यंत मेहनती. वडील किसनराव देशमुख यांचे दीड वर्षापूर्वीच निधन झाले. त्यामुळे घरी केवळ आई. वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईला साथ देत त्याने कमी वयातच पुन्हा मोठ्या उमेदीने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. मागील वर्षी बारावीचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊन त्याने आपले घर चालविण्यासाठी शेतीकडे लक्ष दिले. पेरणीचे दिवस जवळ आले म्हणून, अक्षयने शेतातील कामे सुरू केली.
पावसाळ्यापूर्वी शेताला बांध घालावे, यासाठी दोन दिवसांपासून तो जेसीबीच्या शोधात होता. अखेर जेसीबी चालक शेतात यायला तयार झाला. ९ जून रोजी शेतात काम करण्याचे ठरले. त्यामुळे अक्षय सकाळी लवकर उठून शेतात जाण्याची तयारी करत होता; परंतु काळाने त्याच्या समोर काय वाढून ठेवलं याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. मोठ्या उत्साहाने तो शेतात गेला. जेसीबी आली आणि कामाला सुरुवात झाली. बांध कुठे घालायचा? हे सांगण्यासाठी तो जेसीबीमध्ये चालकाच्या बाजूला बसला. परंतु काही क्षणातच काळाने त्याच्यावर झडप घातली. जेसीबी उलटल्याने अक्षय जेसीबीच्या खाली कोसळला आणि त्याच्या अंगावर जेसीबी कोसळली. स्वत:ला वाचविण्यासाठी त्याने आरडाओरड सुरू केली. परंतु जेसीबी काढणे शक्य नव्हते. जवळपास अर्धा तास तो जेसीबीखाली अडकला. परिसरातील नागरिकांनी दुसरी जेसीबी आणली आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, अक्षयची प्रकृती अत्यवस्थ असल्याने डॉक्टरांनी छत्रपती संभाजीनगर पाठविण्याचा सल्ला दिला. परंतु रस्त्याने जात असतानाच अक्षयने मृत्यूला जवळ केले. या सर्व घटनेदरम्यान 'मला वाचवा...' एवढेच शब्द त्याच्या तोंडून येत होते.