लाचखोर ठाणेदाराला अटक

By Admin | Updated: May 4, 2017 00:40 IST2017-05-04T00:40:41+5:302017-05-04T00:40:41+5:30

मलकापूर- नाहरकत प्रमाणपत्र व जाहिरातीकरिता लाउडस्पिकरच्या परवानगीसाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मलकापूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला बुधवारी रंगेहात पकडण्यात आले.

Bribery Thane gets arrested | लाचखोर ठाणेदाराला अटक

लाचखोर ठाणेदाराला अटक

एसीबीची कारवाई : सह आरोपी नवलेही जाळ्यात

मलकापूर : आनंद मेला व स्वयं रोजगार प्रदर्शन आयोजित करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र व जाहिरातीकरिता लाउडस्पिकरच्या परवानगीसाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मलकापूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला बुधवारी रंगेहात पकडण्यात आले. दुपारी १२ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस स्टेशनच्या आवारातच ही कारवाई केली.
मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालय येथे आनंद मेला व स्वयं रोजगार प्रदर्शन सुरू करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र व जाहिरातीकरिता लाउडस्पिकरची परवानगी मिळण्यासाठी व्यवस्थापक सुरेशराव सावरकर (वय ३३) रा. अकोट जि.अकोला यांनी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक रामकृष्ण कोळी यांच्याकडे रीतसर मागणी केली होती. मात्र, त्यांनी या कामाकरिता १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत योगेश सावरकर यांनी लाचलुचपत कार्यालय बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने १ मे २०१७ रोजी आयोजित केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये आरोपी लोकसेवक रतिलाल शंकर नवले पोलीस नाईक यांनी तक्रारकर्ते योगेश सावरकर यांना ठाणेदार दीपक कोळी यांच्यावतीने तक्रारकर्ते यांना ३५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. २ मे रोजी पुन्हा आयोजित केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये आरोपी लोकसेवक दीपक रामकृष्ण कोळी पोलीस निरीक्षक मलकापूर यांनी योगेश सावरकर यांना नवलेंनी सांगितल्याप्रमाणे ३५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. या गंभीर बाबीची तक्रार झाल्यानंतर बुधवारी सापळा रचून कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये ठाणेदार दीपक कोळी यांनी शहर पोलीस स्टेशन ठाणेदारांच्या कार्यालयात ३५ हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतला. त्यावरून ठाणेदार कोळी, पोलीस नाईक नवले यांच्याविरुद्ध कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विलास पाटील, पोनि एस.बी. भाईक, एएसआय शाम भांगे, पोहेकाँ रवींद्र लवंगे, पोना संजय शेळके, सुखदेव ठाकरे, पोकाँ संतोष यादव यांनी पार पाडली.

अशी केली कारवाई
गत तीन आठवड्यांपूर्वी दीपक कोळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून रूजु झाले होते. नेहमीची ड्युटीवर येण्याची वेळ पाहता त्या मानाने आज ते थोडे लवकरच ड्युटीवर हजर झाले होते. कॅबिनमध्ये बसून घेवाण-देवाण झाली. रक्कम देणारा बाहेर पडला, अन् क्षणार्धात एसीबीचे अधिकारी, कर्मचारी आत धडकले. दरम्यान, पोलीस निरीक्षक कोळी दरवाजापर्यंत येऊन पायऱ्या उतरण्याच्या तयारीत असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी हाताचे मनगट पकडून त्यांना आल्या पावली परत त्यांच्याच खुर्चीवर बसून दरवाजा आतून बंद केला आणि या बंद खोलीतच अधिकाऱ्यांनी सत्यता उघड केली.

शहर पोलीस स्टेशनही सुटले नाही!
शहरातील प्रशासकीय यंत्रणेतील मुख्य अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात गत काळात अडकले. या बाबीला मात्र शहर पोलीस स्टेशन अद्यापपावेतो तरी अपवाद ठरले होते. ती उणीवही शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक कोळी यांना पकडल्यानंतर भरून निघाली. उपविभागीय अधिकारी रामचंद्र मोरे, तहसीलदार लक्ष्मण मेहेंगे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे बायस्कर, दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुसांडे आदी मुख्य अधिकाऱ्यांना यापूर्वी लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले होते. आता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकसुद्धा रंगेहात पकडल्या गेले.

Web Title: Bribery Thane gets arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.