भाजी विक्रेत्यांसाठी बांधलेले ओटे तोडणार
By Admin | Updated: June 16, 2014 22:48 IST2014-06-16T22:35:44+5:302014-06-16T22:48:08+5:30
वापरण्यात न आलेल्या या ओटे बांधकामावर झालेला १३.३0 लक्ष रुपयांचा खर्च व्यर्थ ठरणार आहे.

भाजी विक्रेत्यांसाठी बांधलेले ओटे तोडणार
शेगाव : एकात्मीक शहर योजनेमधून दैनंदिन व साप्ताहीक बाजाराकरिता वर्षे २00९ मध्ये चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेल्या ८४ ओटे न.प. तोडण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे वापरण्यात न आलेल्या या ओटे बांधकामावर झालेला १३.३0 लक्ष रुपयांचा खर्च व्यर्थ ठरणार आहे.
गेल्या आठवड्यात लोकमतने ह्यशेगावचा दैनंदिन आठवडी बाजार रस्त्यावरह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये तत्कालीन शहर विकास योजनेमध्ये चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेले ८४ ओटे ज्याचा वापर आजपर्यंत एकाही भाजी विक्रेत्याने केलेला नाही व त्यामुळेच बाजार रस्त्यावर भरत असल्याचे समोर आणले होते. सदरहू बातमीनंतर न.प.ने उपरोक्त ओटे व त्याच्या बाजुला असलेली न.प.मालकीची जागा हे दोन्ही मिळून त्या ठिकाणी बी.ओ.टी.तत्वावर (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) व्यापारी संकुल व भाजी विक्रेत्यांकरिता योग्य पध्दतीने पुन्हा बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बिओटी तत्वावर बांधण्यात येणार्या व्यापारी संकुल व नविन ओटे यांच्या नकाशामध्ये जुन्या ओट्यांची जागा दाखविण्यात आलेली आहे. तर अंदाजकीय पत्रामध्ये सुध्दा नविन ओट्यांचा समावेश दाखविण्यात आलेला आहे. याचाच अर्थ जुने ओटे पाडल्या जाणार एवढे मात्र निश्चित !
एकात्मीक विकास योजनेमध्ये वर्षे २00९ मध्ये बांधण्यात आलेल्या या ८४ ओट्यांवर एकूण १३.३0 लक्ष रुपये खर्च करण्यात आलेला आहे. या ओट्यांना नगरविकास रचनाकार यांनी स्टॅन्डर्ड परिमापकाप्रमाणे मंजुरात देऊन ओट्यांच्या नकाशाला मंजुरात दिली होती. बांधून झाल्यानंतर सदरहू ओटे हे भाजी विक्रेत्यांकरिता कुचकामी ठरलेले असून पाऊस, ऊन यापासून कुठलाही बचाव होत नव्हता. एवढे चुकीचे असताना नगरविकास रचनाकाराने त्याला मंजुरात कशी दिली? व न.प.चे ही लक्षात का बरं येवू नये? असा प्रश्न निर्माण होतो. आता ते ओटे पाडले जातील तर त्यावर झालेल्या १३.३0 कोटी खर्चाचे काय? याचाच अर्थ शेगावचे नागरिक इमाने-इतबारे नगर पालिकेने आकारलेला कर भरतात व नगर पालिका त्याचा असा चुकीच्या पध्दतीने विनिमय करते.