पितळे महाराजांचा ‘प्रणव अवतार महोत्सव’ सातासमुद्रापार!
By Admin | Updated: January 11, 2015 00:25 IST2015-01-11T00:25:14+5:302015-01-11T00:25:14+5:30
कर्मभूमी मेहकर असलेल्या पितळे महाराजांचा न्यूजर्सीतही होणार महोत्सव.

पितळे महाराजांचा ‘प्रणव अवतार महोत्सव’ सातासमुद्रापार!
ब्रम्हानंद जाधव / मेहकर
विदर्भात वारकरी भक्तीपरंपरेचे बीजारोपण करणारे आणि कपाळी बुक्क्यासोबत अष्टगंध लावण्याची प्रथा रुढ करणारे, मेहकर कर्मभूमी असलेले संत बाळाभाऊ महाराज पितळे यांचा प्रणव अवतार महोत्सव आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. हा महोत्सव १७ ते १९ जानेवारीदरम्यान न्यूजर्सी, पॅरिससह दिल्ली, वाराणसीतही साजरा होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सन १८८८ ला जन्मलेले थोर संत बाळाभाऊ महाराज पितळे ऊर्फ श्वासानंद सरस्वती यांना मानणारा भक्तवर्ग महाराष्ट्रासह परप्रांतातही विखुरलेला आहे. त्यांनी जातीभेद निर्मूलन, धर्मशुद्धीकरण व समाज परिवर्तनासाठी लक्षणीय कार्य केले. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय व वारकरी संप्रदायाचा त्यांनी त्रिवेणी संगम घडवून आणला. महाराणी अहल्याबाई होळकरांचे राजवारस मार्तंडराव होळकर यांनी संत बाळाभाऊ महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. अवघ्या ४२ वर्षांच्या जीवनकालात चारही आश्रमांचे पालन करुन परमहंस दीक्षा घेऊन त्यांनी उत्तरप्रदेशातल्या वाराणसी येथे ह्यसमाधीह्ण घेतली. महाराजांना मानणारा भक्तवर्ग आज महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातही विखुरलेला आहे.
त्यांच्या गुरूगादीवरील विद्यमान श्रीगुरू अँड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या पावन उपस्थितीत मेहकर येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात संत बाळाभाऊ महाराजांचा ८५ वा प्रणव अवतार महोत्सव १७ ते १९ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. त्यामध्ये कीर्तने, प्रवचने, दिंडी परिक्रमा, हरिपाठ, काकडा, गोलरिंगण, भारूडे, महाप्रसाद अश्या भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे.
या प्रमुख महोत्सवासोबतच दिल्ली, वाराणसी, अमेरिकेतील न्यूजर्सी, फ्रान्समधील पॅरिस यांसह महाराष्ट्रात सुमारे ३५ ठिकाणी हा महोत्सव साजरा होत आहे; तसेच दरवर्षी या महोत्सवाच्या संख्येत भर पडत आहे.
दरम्यान उपजीविकेच्या निमित्ताने देश सोडून विदेशात स्थायिक व्हावे लागले. जेथे राहतो तेथेच 'ज्ञानमंदिर' आहे; असे समजून श्रीगुरू रंगनाथ महाराजांच्या प्रेरणेने संत बाळाभाऊ महाराजांचा प्रणव अवतार महोत्सव अमेरिकेतच आम्ही साजरा करीत असल्याचे अमेरिकेतील न्यूजर्सी येथील शशांक पिंगळे यांनी सांगीतले.