ऐन वर्दळीच्या ठिकाणी एसटी बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे प्राण!
By निलेश जोशी | Updated: March 18, 2024 19:35 IST2024-03-18T19:35:40+5:302024-03-18T19:35:57+5:30
बस थांबविण्यासाठी तीन दुचाकींचा झाला चुराडा.

ऐन वर्दळीच्या ठिकाणी एसटी बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे प्राण!
चिखली : एसटी महामंडळाच्या अनेक बस भंगार झाल्या आहेत. मात्र तरीही त्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळत आहेत. एसटी बसेसच्या दूरवस्थेच्या अनेक प्रकार मागील काही दिवसांत समोर आले आहेत. त्यातच आता ऐन उतारावर व वर्दळीच्या ठिकाण ब्रेक फेल झालेली एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखून रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दुचाकींवर चढविल्याने मोठी दुर्घटना टळली.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना १८ मार्चला ५ वाजेच्या सुमारास घडली. मंगरूळहून (इसरूळ) चिखलीकडे प्रवासी घेवून निघालेल्या चिखली आगाराच्या एमएच ४० एन ९९२६ क्रमांकाच्या चिखली-मंगरूळ-चिखली या बसचे छत्रपती शिवाजी महाराज चौक या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अचानकपणे ब्रेक फेल झाले होते. येथे वाहने व नागरीकांची कायम मोठी गर्दी असते. अशास्थितीत वाहनचालक परशराम सुरडकर यांनी प्रसंगावधान राखत चौकातील स्टेट बँकेसमोर बेशिस्तपणे पार्क केलेल्या दुचाकींवर बस चढविली. यामध्ये तीन दुचाक्यांचा चुराडा झाल्याने वित्तहानी झाली असली तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे आठवडी बाजार, स्टेट बँकेतील गर्दी आणि चौकातील वर्दळ पाहता मोठी जिवित हानी टळली आहे. सोबतच बसमधील प्रवासी देखील सुखरूप राहिले आहेत. नसता मोठा अनर्थ घडला असता.