बोथा काजीच्या ’नारायण’ने गाठले यशोशिखर!
By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:18+5:302016-06-07T07:42:18+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत नारायणने दहावीच्या परीक्षेत ९0.६0 टक्के गुण घेतले.

बोथा काजीच्या ’नारायण’ने गाठले यशोशिखर!
नाना हिवराळे /खामगाव
आकाशाला गवसणी घालण्यासाठी पंखाचीच नव्हे, तर धैर्याचीही गरज असते. ही बाब सिद्ध करून दाखविली आहे बोथा काजी येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी नारायण गावंडे याने!
घरची परिस्थिती हलाखीची. आई-वडील रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरी करतात. शिकवणीची सुविधा नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत नारायणने दहावीच्या परीक्षेत ९0.६0 टक्के गुण घेतले आहेत. आता सर्वत्र कॉन्व्हेंट संस्कृतीचा बोलबाला आहे. परिणामी जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा ग्रामीण भागातील पालकांचाही दृष्टिकोन बदलला आहे. तथापि, अशाही बिकट परिस्थितीत ध्येयाने प्रेरित झालेले विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करून यश गाठण्यात हमखास यशस्वी होतात. खामगाव तालुक्यातील बोथा काजी येथील दहावीत यश मिळविलेल्या नारायण परसराम गावंडे या विद्यार्थ्याची कहाणीही अशीच आहे. त्याचे वडील परशराम गावंडे अल्पभूधारक असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी मोलमजुरी करतात. परशराम व पत्नी वंदना दोघेही रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन संसाराचा गाडा ओढत आहेत. घरची परिस्थिती बेताची असली तरी मुलाला शिकविण्याचा ध्यास त्यांनी सोडला नाही. प्रचंड काटकसर करून त्यांनी नारायणला शिकविले आणि नारायणनेसुद्धा आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज केले. नारायणने कम्प्यूटर इंजिनीअर होण्याची अपेक्षा ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केली.