पाच हजारांची लाच घेताना दोघांना अटक
By Admin | Updated: December 24, 2015 02:41 IST2015-12-24T02:41:46+5:302015-12-24T02:41:46+5:30
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना.

पाच हजारांची लाच घेताना दोघांना अटक
बुलडाणा : परिचारिकेचे वेतन व भत्ते काढण्यासाठी तिच्याकडून पाच हजारांची लाच घेताना जिल्हा सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकासह एका शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ डिसेंबर रोजी रंगेहात पकडून अटक केली. या कारवाईमुळे सामान्य रुग्णालयात खळबळ उडाली आहे. माधवराव पडतुजी जायभाये (रा. सोयगाव ता. बुलडाणा) यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक तेजस अनिल डहाळे (२४) याने जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका असलेल्या त्यांच्या मुलीचे वेतन व भत्ते काढण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. तुम्ही पाच हजार रुपये दिले नाहीत, तर यानंतर तुमचे मुलीचे कोणतेही वेतन व भत्त्याचे बिल काढणार नाही, असेही त्याने माधवराव जायभाये यांना धमकावले. दरम्यान, पाच हजार रुपये देण्यासाठी सामान्य रुग्णालयातील रुचिरा टी-सेंटर येथे भेटण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी लाचेची मागणी तेजस डहाळे व त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र शिपाई गजानन लक्ष्मण गिर्हे यांनी पडताळणी पंचनाम्यादरम्यान केली. शिपाई गिर्हे याने दोन हजार रुपये तेजसच्या सांगण्यावरून स्वीकारले, तर उर्वरित तीन हजार रुपये तेजस डहाळे याने पंचांसमक्ष स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडून त्यांनी स्वीकारलेले पाच हजार रुपये रोख पंचांसमक्ष हस्तगत केले. यातील आरोपींनी आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना बेकायदेशीररीत्या लाच स्वीकारण्यास मदत केली व प्रोत्साहन दिले. यावरून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध कलम ७, १२, १३ (१) (ड) सह १३ (२) लाचलुचपत कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.