लुटमारप्रकरणी दोघांना सश्रम कारावास

By Admin | Updated: October 7, 2015 23:52 IST2015-10-07T23:52:43+5:302015-10-07T23:52:43+5:30

शेगाव येथील न्यायालयाने सुनावली शिक्षा.

Both rigorous imprisonment for rigorous imprisonment | लुटमारप्रकरणी दोघांना सश्रम कारावास

लुटमारप्रकरणी दोघांना सश्रम कारावास

शेगाव (जि. बुलडाणा): शेगाव ते जानोरी मार्गावर सायकलस्वाराला अडवून चाकूच्या धाकावर त्याच्याकडील साहित्य व रोख लुटून नेणार्‍या दोघांना शेगाव येथील दिवाणी प्रथम वर्ग न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि १0 हजाराचा दंड ठोठावला. शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेगाव ते जानोरी मार्गावरील सांगवा फाट्याजवळ एका पल्सर मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी सायकलस्वार मुकिंदा अंबादास घाटे (रा. सांगवा) यांना अडवून चाकूच्या धाकावर त्याच्याकडील मोबाइल, घड्याळ आणि ४ हजार ६0 रुपये रोख लुटून नेले होते. ही घटना २९ मे २0१५ रोजी घडली होती. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अशीच घटना नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे घडल्यानंतर नागरिकांनी अटलकुमार काशीरामसिंग यादव ( रा. दादारमुरा, बिहार) आणि योगेश चिंतामण जाधव (रा. सोनगिरी, जि. धुळे) यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या तपास अधिकारी सहायक निरीक्षक आहेरकर यांनी सदर आरोपींना फिर्यादी मुकिंदा अंबादास घाटे याला दाखविल्यानंतर सांगव्याच्या घटनेतही तेच सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर शेगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. विद्यमान न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) अर्चना शहा यांनी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, ११ साक्षीदार तपासले. उभय बाजूंचे युक्तिवाद आणि साक्षीपुराव्यांवर विचार केल्यानंतर आरोपींवरील आरोप सिद्ध झाल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. दरम्यान, या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावतानाच दहा हजार रुपयांचा दंडही सुनावला. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची तरतूदही या शिक्षेत करण्यात आली आहे. सरकारची बाजू अतिरिक्त सरकारी वकील अब्दुल मतीन यांनी मांडली.

Web Title: Both rigorous imprisonment for rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.