बीजभांडवल योजनेत बोगस लाभार्थी
By Admin | Updated: July 31, 2015 23:40 IST2015-07-31T23:40:15+5:302015-07-31T23:40:15+5:30
नियमबाह्य वाटप; लाभार्थ्याच्या नावावर काढले १.१६ कोटी.

बीजभांडवल योजनेत बोगस लाभार्थी
सिद्धार्थ आराख / बुलडाणा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व त्यांच्या अधिनस्थ कर्मचार्यांनी अर्थसाहाय्याच्या विविध योजना राबविताना शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून मनमानी पद्धतीने अक्षरश: खिरापत वाटल्यासारखा योजनांचा पैसा वाटप केला. त्यासाठी जिल्हाभरात दलालांची मोठी फौज उभी करण्यात आली होती. या दलालांमार्फत पैसा वाटप केल्यामुळे मातंग समाजातील गरजू व होतकरू लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळाला नाही. परिणामी शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या निधीचा अपहार करून अण्णाभाऊ साठे अर्थिक विकास महामंडळातील अधिकारी- कर्मचारी व दलालांनीच या पैशावर डल्ला मारल्याचे चौकशीमध्ये सिध्द झाले आहे. बीजभांडवल योजनेंतर्गत मातंग समाजातील गरजू व्यक्तींना व्यवसाय उभा करण्यासाठी ५0 हजार ते १ लाखापर्यंत कर्जपुरवठा केला जातो. मात्र बुलडाणा कार्यालयाने नियमाची ऐशीतैशी करत एका - एका लाभार्थ्याच्या नावावर ४0-४0 लाख रूपये काढले. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना रेखांकीत चेकद्वारे अथवा त्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा करून द्यावी लागते. मात्र सन २0१३-१४ आणि २0१४-१५ या वार्षात कर्ज वाटप करताना कोट्यावधी रूपयाच्या रकमा बेअरर चेकद्वारे तसेच रोखीने वाटप करण्यात आले. या गंभीर बाबीची नोंद चौकशी समितीने घेतली आहे. सन २0१३-१४ मध्ये बिज भांडवल योजने अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातून केवळ चारच लाभार्थ्यांना १ कोटी १६ लाख रुपयाचे मनमाणी प्रकारे कर्ज दिल्याचे दाखविण्यात आले. दलालांच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे व बोगस लाभार्थी दाखवून बिज भांडवल योजनेचे १ कोटी १६ लाख रूपये दलाल व अधिकारी-कर्मचार्यांनी हडप केल्याचे चौकशी समितीने आपल्या अहवालात नमुद केले आहे. या योजनेमध्ये लाभार्थी दाखविलेल्या लोकांच्या घरी जावून चौकशी केली असता लाभार्थ्यांनी कर्ज प्रकरणासाठी कोठेही अर्ज केले नव्हते अशी धक्कादायक माहिती चौकशी अधिकार्यासमोर दिल्याने जिल्हा व्यवस्थापक पी.टी.पवार, लेखाअकिारी व्ही.एस. जाधव आणि यांना सहकार्य करणारा कंत्राटी कर्मचारी राजू मोरे आणि चार दलाल यांनी बोगस लाभार्थी दाखवून बँकांमधून त्यांच्या नवावार लाखो रूपच्या रकमा काढून अपहार केल्याचे निष्पन्न होत असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.