पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह १५ दिवसांनंतर सापडला
By Admin | Updated: July 26, 2016 01:52 IST2016-07-26T01:52:41+5:302016-07-26T01:52:41+5:30
खामगाव तालुक्यातील घटना.

पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह १५ दिवसांनंतर सापडला
खामगाव : नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या २७ वर्षीय मेंढपाळाचा मृतदेह तब्बल १५ दिवसानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत टाकळी तलाव परिसरात आढळून आला. मोताळा तालुक्यातील वारुडी येथील संजय सिध्दू बिचकुले हा मेंढय़ा चराईसाठी खामगाव तालुक्यातील हिवरा बु. शिवारात राहत होता. गत ९ जुलै ते ११ जुलै दरम्यान संततधार पावसामुळे नदीनाले दुथडी भरुन वाहत होते. ११ जुलै रोजी नेहमीप्रमाणे संजय बिचकुले मेंढय़ा चराईसाठी टाकळी तलाव परिसरात गेला. या दिवशी जोरदार पाऊस झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मेंढय़ा घेवून परतत असताना कवठळ नाल्याच्या पुरात तो वाहून गेला. संजय घरी परतला नाही म्हणून नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला मात्र तो दिसून आला नाही. याबाबत नातेवाईकांनी पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. रविवारी टाकळी तलाव परिसरात पाऊस झाल्याने नाल्याला पुन्हा पूर गेला. यामुळे नाल्याचे पात्रात गाळ वाहून गेल्याने संजय बिचकुल याचे प्रेत कुजलेले प्रेत दिसून आले. प्रेताची दुर्गंंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली. मृतकाच्या पश्चात आई, वडिल, सहा भाऊ, पत्नी व दीड वर्षाची मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. सदरची माहिती पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनला कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रेत कुजलेले असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. सदर युवक पुरात वाहून गेला की बेपत्ता झाला याबाबत त्याच्या कुटुंबीयाला सुध्दा माहिती नव्हती.