रक्तदाता निगेटिव्ह.. मन मात्र पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 02:08 IST2016-06-14T02:08:09+5:302016-06-14T02:08:09+5:30
निगेटिव्ह रक्तदात्यांची संख्या अत्यंत कमी असतानाही रक्तदानासाठी समोर येत आहेत.

रक्तदाता निगेटिव्ह.. मन मात्र पॉझिटिव्ह!
फहीम देशमुख / शेगाव
निगेटिव्ह रक्तदात्यांची संख्या अत्यंत कमी असतानाही असे रक्तदाते मात्र पॉझिटिव्ह मन करीत रक्तदानासाठी समोर येत आहेत. त्यामुळे इतर गटातील रक्तांसह निगेटिव्ह रक्तही मिळायला लागल्याने निगेटिव्ह रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचे जीव वाचविण्यात आरोग्य विभागाला यश प्राप्त होत आहे.
दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यासोबतच दुर्धर आजारांच्या संख्येतही वाढ झाली असल्याने अशा रुग्णांना गरज भासते ती रक्ताची. अशावेळी प्रचार, प्रसार व प्रबोधन करून शिबिरे घेण्यास प्रवृत्त केले जाते. त्यातून मोठय़ा प्रमाणात रक्तसाठा होत असला तरी समाजातील चारही प्रवर्गातील निगेटिव्ह रक्त असणारी माणसे कमी आहे त. त्यामुळे या रक्ताचा साठा तुरळक असतो. शिवाय अशा रक्तासाठी मोठमोठय़ा शहरांकडे धाव घ्यावी लागते. रक्तपेढय़ांमध्ये नेहमीच उद्भवणार्या समस्येतून शेगावात मात्र याचा मार्ग काढला गेला आहे.
येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय व खामगाव शहरातील रक्तपेढय़ांनी निगेटिव्ह रक्तदात्यांची यादी तयार केलेली आहे. अनेकांनी ही यादी संगणकीकृत केलेली आहे. यामध्ये संबंधित रक्तदात्याचे नाव, पत्ता व फोन नंबर संग्रहीत केलेले आहेत. गरज भासेल तेव्हा अशा व्यक्तींना बोलावून त्यांना रक्तदान करण्यास सांगितले जाते. रक्तदातेही कुठलाही आव न आणता अशावेळी रक्तदान करतात. यावरून असे रक्तदात्यांचे रक्त निगेटिव्ह असले तरी मन मात्र पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येते. आपल्या रक्तामुळे कुणाचे प्राण वाचू शकतात, याचे आत्मिक समाधान मिळवून घेण्यासाठी हे रक्तदाते समोर येतात.