भाजपची पहिली उमेदवार यादी १५ ऑगस्ट रोजी
By Admin | Updated: August 3, 2014 23:53 IST2014-08-03T23:53:59+5:302014-08-03T23:53:59+5:30
गिरीश महाजन यांची माहिती

भाजपची पहिली उमेदवार यादी १५ ऑगस्ट रोजी
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सर्वत्र सुरू असून, १५ ऑगस्ट रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे पक्ष निरीक्षक गिरीश महाजन यांनी रविवारी दिली. बुलडाणा गर्दे वाचनालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील विधानसभा इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी घेण्यात आल्या. त्यानंतर पत्रकार परिषदेस संबोधताना महाजन यांनी उमेदवार निवड प्रक्रीयेची माहिती दिली. यावेळी सहाय्यक पक्ष निरीक्षक डॉ.भागवत कराड, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, आमदार पांडुरंग फुंडकर आदी उपस्थित होते. भाजपने विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू केले आहे. यासाठी १५ पॅनल तयार केले असून, प्रत्येक पॅनल दोन जिल्ह्यांमध्ये बैठक घेवून इच्छुकांच्या मुलाखती घेत आहे. विधानसभानिहाय सर्व्हेक्षण सुध्दा करण्यात येत असून, इच्छुकांची नावं प्रदेश कार्यकारिणीसमोर ठेवण्यात येणार आहेत. त्यातून सक्षम उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवारांची निवड प्रक्रिया १ ते ५ ऑगस्टदरम्यान होणार असून, भाजपची पहिली उमेदवारांची यादी १५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.