लॉकडाऊनविरोधात भाजप आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:09+5:302021-04-08T04:35:09+5:30
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’चे आवाहन करत ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध केले आहेत. या लॉकडाऊनमध्ये ...

लॉकडाऊनविरोधात भाजप आक्रमक
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’चे आवाहन करत ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध केले आहेत. या लॉकडाऊनमध्ये सरकारने अनेक छोटे दुकानदार, टी सेंटर, सलून यासारख्या लघुव्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा थोडाही विचार केलेला नाही. सरकारच्या या निर्णयामुळे गरिबांचे जीवन व अर्थकारण यावर प्रभाव पडणार आहे. बेरोजगारी व उपासमारीची वेळ सर्वसामान्य नागरिक व लहान-मोठ्या सर्वच व्यावसायिकांवर आली आहे. सरकारने अशापद्धतीचा लॉकडाऊनचा निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांना देशोधडीला लावण्याचा प्रकार सुरू केला आहे, असा आरोप करून सरकारच्या संपूर्ण लॉकडाऊनच्या निर्णयाचा आम्ही सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध व्यक्त करत आहोत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करत लहान-मोठ्या सर्व व्यावसायिकांना आठवड्यातील किमान पाच दिवस त्यांचा व्यवसाय, उद्योग दररोज ८ ते १० तास सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी व दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन ठेवावा. या निर्णयाचे व्यावसायिक नक्की स्वागत करतील. सरकारने या निर्णयावर पुन्हा एकदा फेरविचार करून निर्णय घ्यावा, अथवा येणाऱ्या काळात भाजपच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी आ. विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष पुरषोत्तम लखोटिया, विठ्ठलराव येवले, नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, प्रा. प्रभाकर वारे, दत्ताभाऊ पाटील, नंदिनीताई साळवे, मायाताई पद्ममने, गायकवाड, अशोक शर्मा, अविनाश शेंडे, आशिष दोडे व पदाधिकारी उपस्थित होते.