निराधार योजनेच्या लाभार्थ्यांंचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते
By Admin | Updated: October 30, 2015 02:09 IST2015-10-30T02:09:09+5:302015-10-30T02:09:09+5:30
१६ हजार लाभार्थ्यांचे खाते; इतर बँकेतून अनुदान वाटप नाही.

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांंचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते
बुलडाणा: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवळ राष्ट्रीयीकृत बँकेतूनच लाभ मिळेल. त्यासाठी सर्व लाभार्थ्यांंना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे लागणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानुसार जिल्ह्यातील ९0 टक्के लाभर्थ्यांंचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासारख्या योजनांतील लाभार्थ्यांंचे यापूर्वी विविध बँकांमध्ये बँक खाते उघडण्यात आले होते. दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात मानधनाची रक्कम जमा केली जात होती.; मात्र राज्य शासनाने राष्ट्रीयीकृत बँकेतच लाभार्थ्यांंचे खाते असावे, असा निर्णय घेतला आहे. ज्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते नाही, त्यांना लाभ मिळणार नाही, असा निर्णय शासनाने घेतला होता.. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. लाभार्थ्यांंना पुन्हा नव्याने बँक खाते उघडण्याचा भुर्दंंड पडणार असला तरी त्यामुळे अनुदान वितरण प्रणाली अधिक जलद होऊन खासगी सहकारी बँकेकडून होणारी फिरवाफिरव थांबण्यास मदत होणार आहे. तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १९७ लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे ९७१५ लाभार्थी, तर इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेचे १७९४१ असे १७ हजार २५५ लाभार्थी आहेत. यापैकी तब्बल १६ हजार लाभार्थ्यांंनी अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी खासगी तथा सहकारी बँकेतील खाते क्रमांक बंद करून राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये खाते उघडण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांंचे अद्याप बँक खाते उघडण्यात आले नाहीत. शिवाय नव्याने मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांंचे बँक खाते उघडणे बाकी आहेत. दरम्यान, येथून पुढे सर्व लाभार्थ्यांंना केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमधून मानधनाचे वितरण करण्यात येईल. इतर खासगी अथवा सहकारी बँकांद्वारे मानधनाचे वितरण होणार नाही, यामुळे सर्व लाभार्थ्यांनी तत्काळ राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून त्याची झेरॉक्स प्रत संजय गांधी निराधार योजना विभागात सादर करावी, अन्यथा अनुदानापासून वंचित राहावे लागले, अशी माहिती या विभागाने दिली.