मोदींमुळे देशाची कृषी अर्थव्यवस्था अडचणीत

By Admin | Updated: October 10, 2014 00:23 IST2014-10-10T00:00:45+5:302014-10-10T00:23:57+5:30

सिंदखेडराजा येथील जाहीर सभेत शरद पवार यांचा आरोप.

Because of Modi, the country's agrarian crisis is in crisis | मोदींमुळे देशाची कृषी अर्थव्यवस्था अडचणीत

मोदींमुळे देशाची कृषी अर्थव्यवस्था अडचणीत

मेहकर (बुलडाणा) : मोदींनी सत्तेवर येताच डाळिंब, कांदा व धान्य निर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनाचे भाव गडगडले आणि या मालासाठी विदेशी बाजारपेठ बंद झाली. कृषी अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याचे काम मोदी सरकारच्या निर्णयामुळे झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ९ ऑक्टोबर रोजी जिजाऊसृष्टी येथे आयोजित प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी मोदींवर चौफेर टीका केली. भाजपची सत्ता आल्यापासून शेतमालाचे भाव कमी झाले आहेत. साखर निर्यातीवर बंदी आणून शेतकर्‍यांच्या संसाराला चटका देण्याचे काम या सरकारने केले आहे. शेतमालाचे भाव वाढवून शेतकर्‍यांना आधार देण्याची गरज पवार यांनी अधोरेखित केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही भ्रष्टाचारी नेते असल्याचा आरोप भाजपने केला होता. पक्षाने लगेच चौकशी करून अशा नेत्यांना बाजूला सारले. आता या भ्रष्ट नेत्यांना भाजपने साथ दिली. हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तर भ्रष्टाचारी आणि भाजपात गेले तर साधूसंत, असा याचा अर्थ होतो का, असा सवालही पवार यांनी केला.

* गुजरातेत विद्यार्थ्यांना शिकविला जातो चुकीचा इतिहास
गुजरातमध्ये शालेय स्तरावरील इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव दादोजी कोंडदेव असे छापलेले आहे. ज्या मोदींना छत्रपतींचा इतिहास माहीत नाही, ते महाराष्ट्राच्या दैवताचा मतांसाठी आधार घेत आहेत, असा आरोप पवार यांनी केला.

*सरंक्षण सोडून पंतप्रधान प्रचारात
भारतीय सीमेवर पाकिस्तान दररोज हल्ले करीत असून, या हल्ल्यांमध्ये देशाचे जवानांना शहीद होत आहेत; परंतु पंतप्रधान तिकडे लक्ष देण्याऐवजी महाराष्ट्रात प्रचार सभांसाठी फिरत आहेत. मोदींना संरक्षण मंत्री नेमायलाही वेळ नसून, देशाच्या संरक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

Web Title: Because of Modi, the country's agrarian crisis is in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.