भरधाव अँपे हॉटेलमध्ये घुसला
By Admin | Updated: April 6, 2015 02:04 IST2015-04-06T02:04:26+5:302015-04-06T02:04:26+5:30
हॉटेलचे नुकसान; वाघजाळ फाट्यावरील घटना.

भरधाव अँपे हॉटेलमध्ये घुसला
मोताळा (जि. बुलडाणा): समोरून येणार्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव अँपे हॉटेलमध्ये घुसला. या दुर्घटनेत जीवीत हानी झाली नसली तरी हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना बुलडाणा-मलकापूर मार्गावरील वाघजाळ फाट्यावर ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी पिवळय़ा रंगाचा भरधाव अँपे मोताळय़ाकडून बुलडाण्याकडे जात असतांना वाघजाळ फाटयावरील गजानन दगडू गाडेकर (साधू बुवा) यांच्या हॉटेलसमोर अचानक समोरून येणार्या ट्रिपल सीट दुचाकीला वाचण्यिाच्या प्रयत्नात अँपे चालकाचे नियंत्रण सुटले आणि अँपे सरळ चहाच्या हॉटेलमध्ये घुसले. यावेळी साधूबुवाच्या हॉटेलमध्ये ४-५ ग्राहक चहा घेत होते. मात्र हॉटेलमध्ये लावलेल्या लोखंडी पाईपला अँपे धडकल्याने जिवीत हानी झाली नाही. मात्र या धडकेत हॉटेलची भिंत तुटली असून, गजानन महाराजांच्या नावाने ठेवलेले दोन मोठे रांजण फुटले. यावेळी परिसरातील नागरिक जमा झाले आणि अँपे चालकाला चोप देण्याचा प्रयत्न करीत असतांनाच पोलिस पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. भरधाव वेगात असलेल्या वाहनांमुळे अपघात घडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक ठिकाणी रस्ते चांगले असल्यामुळे व वाहनधारकांना निश्चित स्थळी पोहचण्याची घाई असल्यामुळे भरधाव वेगाने वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातात वाढ होत आहे.