बँकेने एकाच नावाच्या दोन ग्राहकांना दिला एकच खाते क्रमांक!
By Admin | Updated: October 19, 2014 00:04 IST2014-10-19T00:04:50+5:302014-10-19T00:04:50+5:30
खामगावात देना बँकेचा अफलातून कारभार

बँकेने एकाच नावाच्या दोन ग्राहकांना दिला एकच खाते क्रमांक!
खामगाव (बुलडाणा): देना बँकेच्या येथील शाखेने एकाच नावाच्या दोन ग्राहकांना एकच खाते क्रमांक दिल्याचा अफलातून प्रक्रार उघडकीस आला आहे. बँकेच्या या भोंगळ कारभाराचा फटका एका खातेदाराला बसला आहे. दवाखान्यात उपचार घेण्यासाठी पैशांची गरज असल्यामुळे, हा खातेदार बँकेत पैसे काढण्यासाठी गेला असता, त्याच्याच नावाच्या व तोच खाते क्रमांक असलेल्या दुसर्या खातेदाराने आधीच रक्कम काढून घेतली असल्याचे लक्षात आले.
तालुक्यातील विहिगाव येथील रामेश्वर किसन हागे (वय ५५) यांचे गाव देना बँकेच्या खामगावातील शाखेशी जोडण्यात आले आहे. रामेश्वर किसन हागे यांनी सदर बँकेत ७ सप्टेंबर २0१३ रोजी बचत खाते उघडले. त्या खात्यास बँकेकडून १२५७१00३६८४६ हा खाते क्रमांक देण्यात आला. त्यानंतर त्याच गावातील रामेश्वर किसन हागे (वय अंदाजे ३0) यांनी १७ सप्टेंबर २0१३ म्हणजे दहा दिवसानंतर खाते उघडले अस ता, त्यांनाही तोच खाते क्रमांक देण्यात आला. विशेष म्हणजे दोघांनाही ग्राहक कोड क्रमांकही एकच (१0७१२७६६८) देण्यात आला. दोन्ही खातेदारांच्या नामसाधर्म्यामुळे हा प्रकार घडल्याचे उघड आहे.
सोयाबीन नुकसानभरपाईपोटी मिळणारी आर्थिक मदत बँकेत जमा होणार असल्याने, विहिगाव येथील रामेश्वर हागे यांनी त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक संबंधित तलाठय़ाकडे दिला. त्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली. शिवाय सुक्ष्म सिंचन योजनेचे अनुदानसुध्दा जमा झाले. एकूण १0 हजार २६ रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली होती. दरम्यान १६ ऑक्टोबर रोजी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने ते खामगाव येथे उपचारासाठी आले असता, पैसे काढण्यासाठी बँकेत गेले. त्यावेळी त्यांना त्यांच्या खा त्यात केवळ ११६ रुपयेच शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आणि पैसे देण्यास नकार देण्यात आला. नंतर बँकेच्या अधिकार्यांनी सदर प्रकाराचा शोध घेतला असता, एकच खा तेक्रमांक दोन व्यक्तींना देण्यात आल्याने सदर प्रकार घडल्याचे लक्षात आले.
दरम्यान, रामेश्वर हागे यांनी यासंदर्भात लेखी तक्रार नोंदविली असता, सात दिवसात समाधान करण्यात येईल, असे लेखी उत्तर बँकेने दिले आणि दुसरा क्रमांक असलेले पासबुकसुध्दा दिले. रामेश्वर हागेंचे मात्र बँकेच्या या उत्तरामुळे समाधान झालेले नसून, बँकेच्या भोंगळ कारभारामुळे आपल्याला वेळेवर उपचार घेता आले नाहीत, असा रोष त्यांनी व्यक्त केला. तशी तक्रारही त्यांनी बँकेकडे केली आहे.