बंदच्या ‘अड’कित्त्यात हमाल, तोलणारांची उपासमार!
By Admin | Updated: July 21, 2016 00:55 IST2016-07-21T00:55:26+5:302016-07-21T00:55:26+5:30
चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालांना अडत्यांच्या बंदचा फटका.

बंदच्या ‘अड’कित्त्यात हमाल, तोलणारांची उपासमार!
चिखली (जि. बुलडाणा): दुष्काळ व अत्यल्प उत्पन्नामुळे यावर्षी बाजारात शेतमालाची आवक आधीच कमी आहे. त्यातच सध्या पेरणी-पावसाचे दिवस असल्याने शेतमालाच्या हमालीतून मिळणार्या तुटपुंज्या मिळकतीतून कसा-बसा प्रपंच चालविणार्या येथील बाजार समितीतील हमाल व तोलणारांवर आता नवे संकट उभे ठाकले असून, शासनाच्या अडत बंदच्या निर्णयामुळे व्यापार्यांनी पुकारलेल्या बंदमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डतील व्यापार्यांनी शासनाच्या अडत बंदच्या निर्णयामुळे आठवडाभरापासून अडत दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मार्केट यार्डवर सर्वत्र शुकशुकाट आहे. तसेच सध्या पेरणी-पावसाचे दिवस असल्याने सर्व शेतकरी खरीप हंगामात व्यस्त असल्याने बाजार समितीत शेतमालाची आवकच नाही. त्यातही आता अडत दुकाने बंद असल्यामुळे या अडत दुकानांमध्ये तोलाई व हमाली करून उदरनिर्वाह चालविणारे परवानाधारक हमाल व तोलणार कामगार यामध्ये भरडल्या जात असून, हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हमाल व तोलणार कमागारांनी २0 जुलै रोजी बाजार समितीला निवेदन देऊन येत्या तीन दिवसांत बाजार समितीचे व्यवहार तातडीने सुरळीत न झाल्यास समितीचे संचालक गजानन पवार यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हमाल व तोलणार यांनी दिला आहे.