Bandabaja's wedding door closed, time for starvation on artists! | बॅण्डबाजाला लग्नाचे दार बंद, कलावंतांवर उपासमारीची वेळ!

बॅण्डबाजाला लग्नाचे दार बंद, कलावंतांवर उपासमारीची वेळ!

बॅण्ड पथकातील कलावंतांचा हंगाम म्हणजे लग्नसराई. उन्हाळ्यातील लग्नाच्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत बॅण्ड पथक वर्ष घालवतात. त्यावरच बॅण्ड पथकातील कुटुंबांचे वर्षभराचे अर्थचक्र अवलंबून असते, परंतु अलीकडील काळात डीजे आल्याने या पथकावर संक्रांत आली आहे. परंतु काही बॅण्ड पथकांनी न डगमगता या आधुनिकतेचा सामना करत आपल्या पथकामध्ये नवनवीन साहित्यांचा भरणा केला. महागडे साहित्य खरेदी केले. परंतु कोरोनामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. मागील वर्षी लॉकडाऊन लागल्याने पूर्ण लग्नाचा हंगाम खाली गेला. आता या वर्षी पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बॅण्ड वाजविण्याला परवानगी नाकारल्याने कलावंतांसमोर कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कलावंतावर आत्मदहनाची वेळ

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे उपजिल्हाप्रमुख विश्वी येथील प्रदीप खोडके यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह १५ मार्च रोजी मेहकर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. बॅण्ड वाजविण्याला परवानगी नाकारल्याने एका कलावंताने कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने इतर कलावंतांमध्ये खळबळ उडाली आहे.

बॅण्ड पथक आंदोलनाच्या पवित्र्यात

बॅण्ड वाजविण्यासाठी परवानगी देण्यात यावी व लॉकडाऊनच्या काळात बॅण्डचा व्यवसाय बंद असल्यामुळे झालेली नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या कलावंतांनी दिला आहे. या आंदोलनाला वाशिम जिल्ह्यातील विदर्भ म्युझिकल ब्रास बॅण्ड असोसिएशनच्या वतीनेही पाठिंबा देण्यात आला आहे. या वेळी गजानन मिसाळ, दादाराव खोडके, मोहन गवई, सचिन पडघान, रामदास आव्हाडे, मोहन मानमोठे, नंदकिशोर जाधव आदी उपस्थित होते.

कोट....

बॅण्डला परवानगी नाकारल्याने कुटुंब चालवायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे. शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करून बॅण्डला परवानगी द्यावी.

- गजानन मिसाळ, जिल्हाप्रमुख कलावंत न्याय हक्क समिती, बुलडाणा

सलग दुसऱ्या वर्षी बॅण्डला परवानगी दिली नाही. मागील वर्षीच्याच नुकसानातून अद्याप कुटुंब सावरले नाही. आता पुन्हा बंद म्हटल्यावर कसे होणार?

- मोहन गवई, कलावंत, बॅण्ड पथक

४००

जिल्ह्यातील एकूण बॅण्ड पथक

६०००

पथकातील कलावंत

Web Title: Bandabaja's wedding door closed, time for starvation on artists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.