फळबाग योजनेतून केळी गायब
By Admin | Updated: November 30, 2014 23:11 IST2014-11-30T23:11:43+5:302014-11-30T23:11:43+5:30
बुलडाणा जिल्ह्यासाठी शासन स्तरावरुन अनुदान प्रक्रिया सुरु करण्याची मागणी.

फळबाग योजनेतून केळी गायब
संग्रामपूर (बुलडाणा) : खारपाणपट्यातील शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी कृषी विभागाकडून फळपिकांच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येते. मात्र या योजनेत केळी पिकाचे बुलडाणा जिल्ह्याला लक्ष्यांकच देण्यात आले नाही. याबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात नव्या सरकारने सकारात्मक निर्णय घेवून पूर्वीसारखे अनुदान सुरु करुन केळी पिकाच्या लागवडीला चालना द्यावी अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्याला या अगोदर केळी पिकाच्या लागवडीसाठी शासनाच्या कृषी विभागाकडून इतर फळ पिकासारखे अनुदानाची तरतूद होती. केळी लागवडीचे जिल्ह्यातून जळगाव जा. आणि संग्रामपूर या दोन तालुक्यातच क्षेत्र जास्त आहे. म्हणून लक्ष्यांक ही या दोन तालुक्यासाठीच दिले जात होते. संग्रामपूर तालुक्यात ४0 ते ५0 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. या पिकाच्या उत्पादनासाठी पाणी व खर्च भरपूर लागत असल्याने या पिकाकडे शेतकर्यांचा नकारात्मक दृष्टीकोण होता. मात्र शासनाने या पिकासाठी अनुदानाची तरतूद करुन नवीन लागवडीचे क्षेत्र वाढीसाठी मदत केली. त्याकरिता टिश्युकल्चर वाण शेतकर्यांच्या हातात आल्याने एकट्या संग्रामपूर तालुक्यात आज जवळपास १00 ते १२0 हेक्टर क्षेत्रामध्ये टिश्यु केळीची लागवड झालेली आहे. हा भाग खारपाणपट्यात येत असल्याने सिंचनासाठी शेतीला बारमाही पाण्याची व्यवस्था झाल्यास केळी उत्पादनाच्या बाबतीत हा भाग अग्रेसर ठरेल अशी भौगोलिक स्थिती आहे. नवनव्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी या भागामध्ये विशेष बाब म्हणून मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत फलोत्पादन कार्यक्रमही राबविण्यात आला. जळगाव आणि संग्रामपूर हे दोन तालुके केळी पिकासाठी योग्य असल्याने नव्या सरकारकडून याचा विचार व्हावा. केळीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता काकणवाडा गावात केळी उत्पादकांनी पहिली शेतमाल विक्रीची कंपनी स्थापन करुन या भागातील शेतकर्यांसाठी नवी आशा निर्माण करण्याचे काम केले. सोबतच याच केळी उत्पादनावर प्रक्रिया उद्योग उभारणीचाही मोठी संधी आहे. त्यासाठी केळी उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरुन अनुदान प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी होत आहे.