गाेठवणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांचे जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:30 IST2020-12-24T04:30:02+5:302020-12-24T04:30:02+5:30
रब्बी हंगामाच्या पेरण्यांनी तालुक्यात वेग घेतला आहे. शेतकरी खरिपात नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या मूठभर पीक विकून रब्बी हंगामाची पेरणी केली ...

गाेठवणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांचे जागरण
रब्बी हंगामाच्या पेरण्यांनी तालुक्यात वेग घेतला आहे. शेतकरी खरिपात नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या मूठभर पीक विकून रब्बी हंगामाची पेरणी केली आहे. जिल्ह्यात ७० टक्के रब्बी पेरणी आटोपली असून, या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. त्यात दिवसाला वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू राहतो, तर वन्यप्राणी अंकुरलेल्या गहू, हरभऱ्याच्या कोवळ्या रोपांवर ताव मारत आहेत. काही शेतात शेतकऱ्यांनी पेरलेले रब्बी बियाणे रानडुकरे उकरून खात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले असून, रात्री पिकांना पाणी देण्यासह वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी शेतकरी जागरण करीत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.
वन्यप्राण्यांचा हैदोस सुरूच
खरीप हंगामात सततच्या पावसामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामाकडे आशेने पाहू लागले आहेत. तथापि, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत जंगलास लागूनच आहे. या जंगलातील हरीण, रानडुक्कर हे प्राणी अंकुरलेले पीक फस्त करीत आहेत. शिवाय पेरलेले बियाणे उकरून खात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कुडकुडणाऱ्या थंडीत जागरण करून पिकाचे राखण करावे लागत आहे.