लोणार सरोवर विकास व संवर्धनासाठी होणार प्रयत्न
By Admin | Updated: August 7, 2015 01:12 IST2015-08-07T01:12:35+5:302015-08-07T01:12:35+5:30
क्षतिप्रतिबंधक समितीची आज विशेष बैठक.

लोणार सरोवर विकास व संवर्धनासाठी होणार प्रयत्न
लोणार (जि. बुलडाणा) : सरोवराचे जतन आणि संवर्धन होण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गठीत केलेल्या लोणार सरोवर व क्षतिप्रतिबंधक समिती लोणार सरोवर संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबत समितीची तिसरी बैठक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किरणकुमार कुरुंदकर यांच्या अध्यक्षतेखाली ७ आॅगस्ट रोजी स्थानिक महाराष्ट्र पर्यटन संकुलावर पार पडणार आहे.
येथील सरोवराचे जतन व संवर्धन होण्याकरीता शासनस्तरावरुन होणारे प्रयत्न तोकडे पडत असल्याने येथील माजी प्राचार्य सुधाकर बुगदाणे, अॅड.किर्ती निपानकर आणि बाळासाहेब खेकाळे यांनी सरोवराच्या संवर्धनाकरीता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात २००९ मध्ये जनहित याचिका जाहीर केली होती. यावरुन लोणार खाऱ्यापाण्याचे सरोवराचे नैसर्गिकरित्या जतन करण्याकरीता उपाययोजना सुचविण्यासाठी उच्च न्यायालयाने वेगवेगळ्या समित्या गठीत केल्या. या समितीच्या बैठकांनी शतकी गाठल्यानंतरही सरोवराचे विकासाचे घोंगडे अजूनही भिजत आहे. दरम्यान सरोवर क्षतीप्रतिबंधक व संवर्धन समितीची तिसरी बैठक ७ आॅगस्ट रोजी आयोजीत करण्यात आली असून, यामध्ये विस्तृत चर्चा होणे गरजेचे आहे. या बैठकीत चर्चिल्यागेलेल्या मुद्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी सदर बैठकीत पत्रकारांनाही प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी पत्रकार संघाचे सचिव गोपाल तोष्णीवाल यांच्यासह पत्रकार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.