जावयाचा मेहुणीवर अत्याचार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST2021-09-13T04:33:36+5:302021-09-13T04:33:36+5:30
एकविस दिवसांनतर प्रकरण आले उघडकीस चिखली : येथील एका १७ वर्षांच्या मुलीला सख्ख्या मेहुण्याने घरातून फूस लावून सोबत नेत ...

जावयाचा मेहुणीवर अत्याचार !
एकविस दिवसांनतर प्रकरण आले उघडकीस
चिखली : येथील एका १७ वर्षांच्या मुलीला सख्ख्या मेहुण्याने घरातून फूस लावून सोबत नेत चालत्या गाडीत लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना २० ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी पीडितेने २३ ऑगस्टला दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हादेखील दाखल केला आहे. मात्र, या घटनेला तब्बल २१ दिवसांनतर वाचा फुटली आहे.
चिखली शहरातील एक १७ वर्षीय मुलगी २० ऑगस्ट रोजी आपल्या आई-वडिलांसोबत घरीच होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानकपणे घरी आलेल्या जालना येथील तिच्या मेहुण्याने २५ ऑगस्टला पीडित मुलीचा वाढदिवस असल्याने तिला कपडे खरेदी करून देतो म्हणत दुचाकीवर शहरातील एका रेडिमेड कापडाच्या दुकानातून कपडे घेऊन दिले. दरम्यान, तिला घरी न नेता त्याने जुन्या मेहकर रोडवर नेले. तेथे आधीपासूनच उभ्या असलेल्या एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून तिचे अपहरण केले व चालत्या गाडीतच तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला. दुसरीकडे घरून जावयासोबत गेलेली मुलगी अजूनही घरी न आल्याने घरच्यांनी आपल्या मोठ्या मुलीला याबाबत माहिती दिली. दरम्यान, मेहुण्याने रात्री ३ वाजेच्या सुमारास पीडितेला बहीण व घरच्यांना काही सांगितले तर तुला आणि तुझ्या बहिणीला मारून टाकेन, तुझे व्हिडीओ माझ्याकडे असून ते व्हायरल करून तुला बदनाम करून टाकेन, अशी धमकी देत जालना येथे आपल्या घराबाहेर सोडून पळ काढला.
दरम्यान, पीडितेने ही बाब तिची बहीण व कुटुंबीयांना सांगितली. घाबरलेल्या मुलीला धीर देत तिचे आई-वडील व पीडितेच्या मोठ्या बहिणीसमवेत २३ ऑगस्ट रोजी सकाळी चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार, बलात्कारासह विविध कलमान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तपास सुरू केला.
--उशिराने प्रकरण उघड--
या प्रकरणाची वाच्यता झाल्यास पीडितेच्या विवाहात अडथळा व समाजात बदनामी होण्याची भीती पीडितेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. त्यामुळे प्रकरणाची माहिती कोणालाही न देण्याची विनंती चिखली पोलिसांकडे त्यांनी केली होती. मात्र आता तब्बल २१ दिवसांनंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर नेमकी कोणती कारवाई केली ही बाबही अद्याप अस्पष्टच आहे.