जिल्हाभरातील ‘एटीएम’ केंद्रांवर ठणठणाट!

By Admin | Updated: April 20, 2017 00:27 IST2017-04-20T00:27:36+5:302017-04-20T00:27:36+5:30

२० दिवसांपासून एटीएममध्ये पैसेच नाहीत: पुन्हा नोटाबंदीसारखी स्थिती उद्भवल्याने नागरिक त्रस्त

ATM centers across the district | जिल्हाभरातील ‘एटीएम’ केंद्रांवर ठणठणाट!

जिल्हाभरातील ‘एटीएम’ केंद्रांवर ठणठणाट!

नीलेश शहाकार - बुलडाणा
नोटाबंदीनंतर सुरळीत झालेली सर्वच बँकांची एटीएम सेवा पुन्हा विस्कळीत झाली असून, सद्य:स्थितीत शहरातील बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट आहे. काही बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी अघोषित मर्यादा लागू करण्यात आल्या असल्याने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना फटका बसतो आहे, त्यामुळे शहरातील २० एटीएम केंद्रांमध्ये पुन्हा नोटाबंदीनंतरचेच चित्र निर्माण झाले आहे.
मागील वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला देशाच्या चलनातून जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या. बाद नोटांच्या तुलनेत नव्या नोटा बाजारात न आल्याने या काळात प्रचंड चलन टंचाई निर्माण झाली होती. या काळात बँकांची एटीएम पूर्णत: बंद होती. त्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा दोन हजारांपासून सुरू करीत मागील दीड महिन्यांपूर्वी आवश्यक तितकी रक्कम एटीएममधून मिळत होती. त्यानंतर एटीएम सेवा सुरुळीत झाली असतानाच आर्थिक वर्षांच्या शेवटी ही सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे.
शहरात सर्व मोठ्या राष्ट्रीयीकृत व खासगी बँकेचे जवळपास सर्वच एटीएम बंद असल्याचे दिसून येते. काही एटीएम केंद्रांना चक्क टाळेच ठोकण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उघड्या असणाऱ्या एटीएमवर रक्कम नसल्याचे फलक झळकत आहेत. इतर बँकांच्या सुमारे ४० ते ६० टक्के एटीएम केंद्रांमध्ये ठणठणाट असल्याने तीही बंद ठेवण्यात आली आहेत. मार्चच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एटीएमची ही समस्या सुरू झाली असून, आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ती आणखी तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.
आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला १० तारखेपर्यंत नोकरदारवर्गाचे वेतन आणि साधारण १५ ते १९ तारखेपर्यंत सेवानिवृत्तीधारकांची पेन्शस जमा होते. त्यामुळे रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर ती काढण्यासाठी नागरिकांना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रक्कम असलेल्या एटीएम केंद्राचा शोध घ्यावा लागत आहे. एटीएम केंद्रांतून विशिष्ट रक्कम काढण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे; मात्र शहरातील काही एटीएममध्ये रक्कम काढण्यावर अघोषित मर्यादा घालण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी चार हजार ते दहा हजारांपर्यंतच रक्कम नागरिकांना काढता येते. त्यातही केवळ दोन हजारांच्या किंवा केवळ पाचशे रुपयांच्या नोटा एटीएममधून मिळत आहेत.
नोटांची कमतरता निर्माण झाल्यामुळे बँकांकडून एटीएममध्ये पुरेशी रक्कम भरली जात नसल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकारामुळे नागरिकांना पुन्हा एकदा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

बंद एटीएम केंद्रांपुढे नागरिकांच्या रांगा
शहरातील एटीएम मशीनचा आढावा घेतला असता, आज शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम बंद होते; मात्र तरीही भरउन्हात एटीएम केंद्रापुढे नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत चौकशी केली असता, एटीएम केंद्राचे गेट बंद करुन आत मशीनमध्ये रक्कम भरण्याचे काम सुरु असल्याची माहिती उपस्थितांनी दिली. त्यामुळे केंद्र उघडल्यास आपल्याला पैसे भेटावे, या उद्देशाने नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.

कॅश नसल्याचे फलक, सुरक्षारक्षक गायब
शहरातील सेंट्रल बँंक, आयसीआयसी बँक, युनियन बँक, बँक आॅफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेचे एटीएम पुढे कॅश नसल्याचे फलक लावण्यात आले होते. शिवाय येथील सुरक्षा रक्षकही गायब होते, तर कारंजा चौकातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम बेवारसपणे उघडेच होते. काल सायंकाळपर्यंत शहरातील काही एटीएम मशीनपुढे ग्राहकांच्या रांगा होत्या. आज सकाळनंतर रक्कम संपल्यामुळे येथील सुरक्षारक्षकांनी एटीएम बंद केले. यामुळे शहरातील नागरिकांचा आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला होता.

रकमेवर शुल्क आकारणीचा फटका
४शहरातील अनेक एटीएम केंद्रांमध्ये रक्कम काढण्यावर अघोषित मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक रक्कम काढण्यासाठी विविध एटीएम केंद्रांमध्ये नागरिकांना जावे लागत आहे. एटीएम केंद्रातून पैसे किती वेळा काढायचे, यावर बँकांनी मर्यादा घातल्या आहेत. या मर्यादेनंतर संबंधित ग्राहकाकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. सद्यस्थितीत रक्कमच मर्यादित स्वरुपात मिळत असल्याने आवश्यक रक्कम काढण्यासाठी वेळोवेळी एटीएमचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक अतिरिक्त शुल्काचा बोजाही सोसावा लागत आहे.

तीन दिवसात संपले ५० लाख
ं‘एनी टाइम मनी’ अशी संकल्पना असलेले विविध बँकेचे एटीएम शहरातील चौकाचौकात आहेत; मात्र गरजेएवढी रक्कम एटीएममध्ये भरल्या जात नसल्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. बँक ग्राहकांना कु ठलाही आर्थिक त्रास होऊ नये, म्हणून त्यांच्या एटीएममध्ये आठवड्याच्या सुरुवातीला ५० लाख रुपयांची रोख रक्कम भरण्यात आली होती; मात्र त्यानंतर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी झुंबड केल्यामुळे दोनच दिवसात ही रक्कम संपली. परिणामी, आज पुन्हा शहरातील सर्वच एटीएममध्ये पैश्याचा ठणठणाट आहे.

शंभरीच्या नोटांसाठी सर्वांची धाव
बऱ्याच केंद्रावरील एटीएममधून केवळ पाचशे व दोन हजाराच्या नोटा निघतात; मात्र स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएम असणाऱ्या तीन मशीनपैकी एकातून शंभर रुपयांची नोट देण्याची सुविधा आहे. त्यामुळे शंभरीच्या नोटा मिळविण्यासाठी सदर बँकांच्या एटीएममध्ये नागरिकांची छुंबड उडत आहे.

Web Title: ATM centers across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.