बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ६८ हजार ध्वज सदोष! खामगाव पालिकेने केले पाच हजार २०० ध्वज रद्द
By अनिल गवई | Updated: August 12, 2022 20:26 IST2022-08-12T20:25:50+5:302022-08-12T20:26:48+5:30
खामगाव नगर पालिकेत शासन स्तरावरून प्राप्त सहा हजार आठशे ध्वजांपैकी पाच हजार दोनशे ध्वज सदोष आले आहेत. त्यामुळे पालिकेने या ध्वजांची विक्री थांबविली आहे. सदोष आलेले ध्वज परत पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ६८ हजार ध्वज सदोष! खामगाव पालिकेने केले पाच हजार २०० ध्वज रद्द
- अनिल गवई
खामगाव - खामगाव नगर पालिकेत शासन स्तरावरून प्राप्त सहा हजार आठशे ध्वजांपैकी पाच हजार दोनशे ध्वज सदोष आले आहेत. त्यामुळे पालिकेने या ध्वजांची विक्री थांबविली आहे. सदोष आलेले ध्वज परत पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानातंर्गत घरोघरी लावण्यासाठी वरिष्ठ स्तरावर मागणी नोंदविण्यात आली. अमरावती विभागाने १२ लाख ध्वजांची मागणी केली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याने अडीच लक्ष ध्वज मागविले. उपलब्धतेनुसार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रशासकीय स्तरावरून ध्वज उपलब्ध करून देण्यात आले. खामगाव नगर पालिकेला सुरूवातीला पाच हजार ९०० ध्वज प्राप्त झाले. त्यानंतर एक हजार ध्वज प्राप्त झाले. सुरूवातीच्या ध्वजापैकी तब्बल पाच हजारावर तर नंतर प्राप्त झालेल्या एक हजार ध्वजांपैकी २०० ध्वज सदोष निघाले. त्यामुळे या ध्वजांची विक्री पालिकेने थांबविली आहे. त्याचवेळी नांदुरा, मलकापूर, शेगाव, जळगाव येथेही सदोष ध्वजाचा पुरवठा झाला असून, जिल्ह्यात ६८ हजारांपेक्षा अधिक सदोष ध्वज प्राप्त झाल्याचे समजते.
सदोष ध्वज काढले बाजूला..
कापड उसवलेले, आयातकार नसलेले, तसेच ध्वजाच्या रंगावर डाग असलेले सदोष ध्वज बाजूला काढण्यात आले आहेत. दरम्यान, खामगाव पंचायत समितीत आलेले सदोष ध्वज यापूर्वीच बदलविण्यात आले आहेत.
सदोष ध्वजांची संख्या मोठी
स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त असलेल्या ध्वजांपैकी ३४ टक्के ध्वज सदोष असल्यामुळे प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे. त्याचवेळी ध्वज वेळीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांची चांगलीच धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.
सदोष असलेल्या ध्वजांची विक्री थांबविली आहे. सदोष ध्वज परत पाठविण्यात येतील. सदोष ध्वज परत देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून निर्देश प्राप्त झाले आहेत.
-मनोहर अकोटकर
मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.