पावसाच्या आगमणाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:42+5:302021-06-18T04:24:42+5:30
काही दिवसापासून सिंदखेड राजा तालुक्यातील मोजक्या भागात हलक्या सरी पडल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीला सुरुवात केली होती. ...

पावसाच्या आगमणाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
काही दिवसापासून सिंदखेड राजा तालुक्यातील मोजक्या भागात हलक्या सरी पडल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीला सुरुवात केली होती. मात्र किनगाव राजा परिसरासह अनेक गावातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास संपूर्ण परिसरातील व गावातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्याची कामे आटपून व शेतीची योग्य पद्धतीने मशागत करून शेतीही पेरणीसाठी तयार करून ठेवलेली आहे. परंतु वरूणराजाने पाठ फिरवल्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेत होता. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच बहुतांश तालुक्यात थोड्याफार प्रमाणात का होईना पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अल्प प्रमाणात का होईना पाऊस पडल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यास सोयीस्कर झाले होते. काही भागात पेरणीसह कपाशी व तूर लागवडीला सुरुवातही झाली होती. परंतु किनगाव राजा सह काही गावात अद्यापही पावसाचा थेंब देखील पडलेला नव्हता. शेतकरी जून महिन्याचे बारा दिवस उलटून गेले असतानाही पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत
पेरणीपूर्व खर्चाचा हिशोब केला असता शेतकऱ्यांना एक एकर शेत नांगरणी करिता किमान १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपये लागतात. त्यानंतर रोटाव्हेटर करिता ९०० ते १००० रुपये, वखरणीसाठी १२०० रुपये असे एकूण मशागतीसाठी सुमारे ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. पेरणीसाठी १२०० ते १५०० रुपये खर्च येतो. सोयाबीनच्या ३० किलोच्या एका पिशवी करिता ३,४०० ते ४,००० हजार रुपये मोजावे लागत आहे. खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
शेतकरी बांधवांनी १०० मिमी पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये, आता पावसाचे वातावरण तयार झाले आहे. ५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येत्या पाच जुलैपर्यंत पेरणी झालेल्या सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये कोणतीही घट येणार नाही. यामुळे शेतकरी वर्गाने घाबरून जाऊ नये.
वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेड राजा.