दर्जेदार कामासाठी लोकसहभागाचे आवाहन

By Admin | Updated: December 22, 2014 00:49 IST2014-12-22T00:49:28+5:302014-12-22T00:49:28+5:30

हर्षवर्धन सपकाळ यांचा पुढाकार : रस्त्याच्या कामाचा तपशील जाहीर.

Appeal for public participation for quality work | दर्जेदार कामासाठी लोकसहभागाचे आवाहन

दर्जेदार कामासाठी लोकसहभागाचे आवाहन

बुलडाणा : कोट्यवधी रूपये खर्च करूनही रस्त्याचे काम दज्रेदार न होणे, हा अनुभव तसा सार्वत्रिकच आहे. अवघ्या काही महिन्यात रस्ते खराब होतात आणि रस्त्यावरून येता-जाता शिव्यांची लाखोली सारेच वाहतात. प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू असताना, कामाचा दर्जा पाहण्याची तसदी कुणी घेत नाही. कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी नागरिकांची नसली तरी, कर्तव्य नक्कीच आहे. कारण तो पैसा त्यांच्याच घामाचा असतो. म्हणूनच बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी विकास कामांसदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला असून, दर्जेदार कामासाठी लोकसहभागाचे आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुकीत आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी कमीशनराज संपवू आणि विकास कामे करताना ती दज्रेदार करू, असा विश्‍वास दिला होता. चिखली नाका ते धाड नाका या २ कि.मी. सर्कल रोडचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता दज्रेदार व चांगल्या प्रतीचा व्हावा, यासाठी आ. सपकाळ यांनी सोशल नेटवर्कींंगद्वारे लोकांना आवाहन केले आहे. रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार व्हावे, यासाठी नागरीकांनी दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता शेळके यांचा मोबाईल नंबर त्यांनी जाहीर केला आहे. याशिवाय कामात पारदर्शकता असावी, यासाठी रस्त्याच्या संपूर्ण कामाचे विवरण सोशल साईटस्वर जाहीर केले आहे. रस्त्याच्या कामासाठी ८६ लाख ६२ हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून ५0 एमएम गट्टीचा पहिला कोट, २0 एमएम गट्टीचा दुसरा कोट, त्यावर हॉटमिक्सचे डांबरीकरण, असे या कामाचे स्वरुप आहे. याशिवाय नागरीकांना या कामाबाबत काही अडचणी आल्यास संपर्क कार्यालयाचा आणि आ. सपकाळ यांनी स्वत:चा मोबाईल नंबर देवून संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. कामात पारदर्शकता आणण्यासाठी आ. सपकाळ यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सोशल नेटवर्कींंगच्या दुनियेत स्वागत होत आहे.

Web Title: Appeal for public participation for quality work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.