ऐन दिवाळीत प्रवास महागला!
By Admin | Updated: October 18, 2014 23:59 IST2014-10-18T23:59:22+5:302014-10-18T23:59:22+5:30
खासगी ट्रॅव्हल्सची भाडेवाढ, प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड.

ऐन दिवाळीत प्रवास महागला!
खामगाव (बुलडाणा): दिपावलीनिमित्त वाढती गर्दी लक्षात घेता, खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सुट्यांच्या तोंडावर गावी जाण्याचा प्रवास महागला आहे. येथील खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी भाड्यात सरासरी २00 ते ३00 रुपयांनी वाढ केली असून, परवा सोमवारपासून ती लागू होणार आहे.
ह्यरेल्वे व एसटीह्ण च्या जादा गाड्यापैकी आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी लोकांनी आपला मोर्चा खासगी ट्रॅव्हल्स, सुमो, क्वॉलिस, स्कार्पिओ, या गाड्यांकडे वळविला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, शिर्डी, इंदौर आणि सुरत आदी ठिकाणाच्या भाड्यात वाढ झाल्याचे तुषार ट्रॅव्हल्सने सांगितले आहे.
भाडेवाढीनंतरही मुंबई, नागपूर, सुरत, औरंगाबाद, इंदौर मार्गावरील ट्रॅव्हल्सचे आरक्षण १८ नोहेंबरपर्यंत फुल्ल झाले आहे. काही ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांच्या आग्रहास्तव दोन्ही सीटच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर स्टूल किंवा साध्या खुर्चीची व्यवस्था करून प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवासभाडे मात्र वाढीव आकारले जात आहे. गरज म्हणून प्रवासाही मिळेल अशा जागेतच प्रवास करणे पसंत करीत आहेत.