अनिसचे पंतप्रधानांना काळे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 13:26 IST2016-08-22T13:26:40+5:302016-08-22T13:26:40+5:30
डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे आणि प्रा.डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्या मारेक-यांची रेखाचित्रे ही राज्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावी.

अनिसचे पंतप्रधानांना काळे निवेदन
ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. २२ - महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घुण खुनाला ३६ महिने पूर्ण झाल्यावरही तपासकार्यास गती प्राप्त होत नाही, याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने बुलडाणा शहरातील विविध संस्था, संघटनांच्यावतीने जिल्हाधिका-यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे निवेदन देण्यात आले.
डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे आणि प्रा.डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्या मारेक-यांची रेखाचित्रे ही राज्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावी,
तसेच सारंग अकोलकर, प्रविण निंबकर, रूद्र पाटील व जयप्रकाश हेगडे या एएनआयला हवे असलेल्या सनातन संस्थेच्या फरार साधकांचे एनआयएच्या वेबसाईटवरील फोटो राज्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.