संतप्त शेतक-यांनी केली तोडफोड!

By Admin | Updated: December 2, 2015 02:30 IST2015-12-02T02:30:00+5:302015-12-02T02:30:00+5:30

मोताळा तहसीलमधील प्रकार : पीक अनुदानाचे पैसे मिळाले नाही!

Angry farmers cracked down! | संतप्त शेतक-यांनी केली तोडफोड!

संतप्त शेतक-यांनी केली तोडफोड!

मोताळा (जि. बुलडाणा): मागील वर्षाचे पीक अनुदानाचे पैसे मिळाले नसल्याच्या कारणावरून मनसेचे माजी तालुका प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकर्‍यांनी तहसीलदार यांच्या टेबलावरील काच फोडल्याची घटना १ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील आव्हा, सावरगाव जहागीर, सारोळापीर, पोफळी, माकोडी, वाडी, रोहिणखेडसह इतरही अनेक गावातील शेतकर्‍यांचे मागील वर्षीचे शेती पिकाचे अनुदान तहसील कार्यालयात चकरा मारूनसुद्धा मिळाले नाही. शेवटी मनसेचे माजी ता. प्रमुख रावसाहेब पाटील यांनी सर्व गावातील शेतकर्‍यांना घेऊन अनुदान का मिळत नाही, याचा जाब विचारण्यासाठी तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी दाखल झाले. या वेळी प्रभारी तहसीलदार चव्हाण हे ट्रेनिंगला गेलेले असल्यामुळे नायब तहसीलदार विद्या गौर यांना या बाबत शेतकर्‍यांनी विचारणा केली. दरम्यान, गौर यांनी संबंधित अनुदान वाटपाचे कर्मचारी रायबोर्डे, आव्हा गावाचे तलाठी राऊत, एचडीएफसी बँकेचे कर्मचारी यांना तातडीने तहसील कार्यालयात बोलावून उपस्थित शेतकर्‍यांसमोर पिक अनुदानाबाबतच्या माहितीची विचारणा केली; मात्र कर्मचार्‍यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी तहसीलदार यांच्या टेबलावरील काच फोडली. स्थानिक तहसील कार्यालयाचा कारभार हा प्रभारी असून, ना. तहसीलदार एस. एम. चव्हाण कारभार सांभाळत आहेत. आज ते ट्रेनिंगसाठी बुलडाणा गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत एकमेव ना. तहसीलदार विद्या गौर यांना तहसील कार्यालयाचा कारभार हाताळावा लागत आहे. मोताळा तहसील हे संवेदनशील तहसील म्हणून गेल्या चार पाच वर्षांंंपासून प्रसिद्ध आहे. शासनाने नुकतीच कायमस्वरूपी तहसीलदार म्हणून रूपेश खंदारे यांची नियुक्ती केली असून, त्यांनी त्वरित मोताळा तहसील कार्यालयाचा पदभार घेऊन कार्यालयाची बिघडलेली परिस्थिती रुळवर आणावी, अशी जनतेची मागणी आहे.

Web Title: Angry farmers cracked down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.