शेगाव कोविड सेंटरमध्ये जेवण न मिळाल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 10:58 IST2021-03-13T10:58:09+5:302021-03-13T10:58:26+5:30

Covid Care Center दोनशेहून अधिक पाॅझिटिव्ह रुग्ण असून, शुक्रवारी दुपारपर्यंत जेवण मिळाले नाही.

Anger of positive patients due to non-availability of food at Shegaon Covid Center | शेगाव कोविड सेंटरमध्ये जेवण न मिळाल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांचा संताप

शेगाव कोविड सेंटरमध्ये जेवण न मिळाल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांचा संताप

लोकमत न्युज नेटवर्क

शेगाव : सकाळचे जेवण दुपारी दोन वाजेपर्यंतही न आल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांनी कोविड सेंटरच्या परिसरात येत संताप व्यक्त केला. शासकीय कोविड सेंटरमध्ये दोनशेहून अधिक पाॅझिटिव्ह रुग्ण असून, शुक्रवारी दुपारपर्यंत जेवण मिळाले नाही. त्यामुळे रुग्ण भुकेने व्याकूळ झाले.

शेगाव येथील विसावा केंद्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोविड उपचार केंद्र आहे. या कोविड केंद्रामध्ये जवळपास ३६० रुग्ण आहेत. दुपारचे जेवण दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत वेळेवर जेवण न येता २ वाजून ३० मिनिटांपर्यंतही या कोविड केंद्रामध्ये जेवण न आल्यामुळे रुग्णांनी संताप व्यक्त केला. तसेच विसावा कोविड केंद्राच्या परिसरात चक्क बाहेर आले. जवळपास २६० रुग्णांनी रस्त्यावर येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वेळेवर जेवण न मिळणे, निकृष्ट दर्जाचे जेवण व सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. तक्रारींची कोणीही दखल घेत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर आल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्वांत आधी उपाशी रुग्णांना जेवण देण्याच्या सूचना दिल्या. जेवण उशिरा का देण्यात आले, याबाबत चौकशी केली जाईल. तसेच दोषींवर कारवाई करण्यात येईल.

-दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी

 

जेवण पुरवण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केला आहे. जेवण उशिराचा प्रकार समजताच चौकशी केली असता सिलिंडर संपल्याने जेवण देण्यास उशिर झाल्याचे समजले. रुग्णांना जेवणास विलंब झाल्यामुळे शुक्रवारचे देयक कंत्राटदाराला दिले जाणार नाही.

- शिल्पा बोबडे, तहसीलदार, शेगाव

Web Title: Anger of positive patients due to non-availability of food at Shegaon Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.