अंगणवाड्यांना कच्च्या धान्याचा पुरवठाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 04:10 PM2019-08-28T16:10:19+5:302019-08-28T16:10:24+5:30

अंगणवाडीत कच्चे धान्य पोहोचलेच नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे.

Anganwadis have no supply of raw grain! | अंगणवाड्यांना कच्च्या धान्याचा पुरवठाच नाही!

अंगणवाड्यांना कच्च्या धान्याचा पुरवठाच नाही!

Next

अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव तालुक्यातील विविध अंगणवाड्यांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या अंगणवाडीत कच्चे धान्य पोहोचलेच नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. तर काही ठिकाणी ५० दिवसांच्या किटऐवजी खुली पाकीटं वितरीत केल्या जात आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी कच्च्या धान्यांपासून वंचित असल्याचे दिसून येते.
अंगणवाडी मधील ०६ महिने ते ०३ वर्ष वयोगटातील लाभार्थी, गरोदर व स्तनदा माता तसेच कमी वजनाची बालके आणि ११ ते १४ वर्ष वयोगटातील कुमारवयीन मुलींना लाभार्थी निहाय सीलबंद पाकीटमध्ये कच्चे धान्य पुरवठा करण्यासाठी शासनाने ३० मार्च २०१९ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. यासाठी लाभार्थी निहाय पाककृती निश्चित करून महाराष्ट्र कन्झुमर्स फेडरेशनला पर्यायी व्यवस्थेतंर्गत कंत्राट देण्यात आला आहे. फेडरेशनने यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे कंत्राटदार नियुक्त केले आहेत. मात्र, या कंत्राटदारांकडून नियमित कच्चे धान्यांचा पुरवठा केला जात नसल्याचे दिसून येते. आयुक्तांच्या ३० मार्च २०१९ च्या आदेशानुसार १५ आॅगस्ट २०१९ पर्यंत ३ वेळा म्हणजे माहे मे/जून (५० दिवस), जुलै/ आॅगस्ट (५० दिवस) आणि सप्टेंबर/ आॅक्टोंबर (५० दिवस) अशा एकुण १५० दिवसांसाठी प्रत्येक लाभार्थ्यांना, त्यांच्या गटानुसार माहे मे -२०१९ पासून आतापर्यंत ३ वेळा म्हणजेच १५० दिवसांचे कच्चे धान्य मिळणे आवश्यक होते. मात्र, खामगावसह अनेक तालुक्यात पूर्ण मालाचे वितरण झालेले नाही. तसेच वितरीत केल्या जाणाऱ्या धान्यांबाबत आदेशाची प्रत मंगळवारी खामगाव येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयात मिळून आली नाही. तसेच पुरवठा करण्यासंदर्भात कोणतेही लेखी निर्देश प्राप्त झाले नाही. तसेच माहे सप्टेंबर/ आॅक्टोबरचा पुरवठा पूर्ण झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तसेच येत्या १-२ दिवसांत खामगाव तालुक्यातील सर्वच अंगणवाडीत माल पोहोचणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून आयुक्तांनी ठरवून दिलेल्या मालाचे प्रमाण आणि पॅकींगबाबत कमालिची गुप्तता पाळल्या जात असल्याचे दिसते.

असे आहे लाभार्थी निहाय धान्य वितरण!
०६ महिने ते ३ वर्ष लाभार्थी करीता ५० दिवसांसाठी १ मोठी सीलबंद पिशवी देणे आवश्यक आहे. यात गहू-२.९५० किलो, मसूरडाळ-७५० ग्राम, मुगडाळ- ६६९ ग्राम, मिरची पावडर -२०० ग्राम, हळद-२०० ग्राम, मीठ ४०० ग्राम, सोयाबीन तेल- ५०० ग्राम, चवळी-७५० ग्राम, मटकी-६५० ग्राम याप्रमाणे मोठ्या सीलबंद पिशवीमध्ये एकुण ७ किलो ५० ग्राम कच्चे धान्य देण्याची तरतूद आहे.गरोदर स्त्रीया व स्तनदा माता आणि किशोर वयीन मुलींकरीता - गहू ३.७७५ किलो, मसुरडाळ-९५० ग्राम, मूगडाळ-८२५ ग्राम, मिरची पावडर-२०० ग्राम, हळद- २०० ग्राम, मीठ ४०० ग्राम, सोयाबीन तेल- ५०० ग्राम, चवळी- १ किलो, मटकी- ८२५ ग्राम मिळणे क्रमप्राप्त आहे.

खामगाव तालुक्यातील किती अंगणवाड्यांमध्ये कच्च्या धान्यांचा पुरवठा झालेला नाही. याबाबत पर्यवेक्षकांकडून आढावा घेण्यात आलेला नाही. आढावा घेतल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल.
- यु.डी. देशमुख
बालविकास प्रकल्प अधिकारी, खामगाव.

Web Title: Anganwadis have no supply of raw grain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.