अंगणवाडीत शिजत नाही पोषण आहार!
By Admin | Updated: March 3, 2016 02:06 IST2016-03-03T02:06:49+5:302016-03-03T02:06:49+5:30
चांडोळ येथे पोषण आहारासाठी धान्याचा साठा नाही!

अंगणवाडीत शिजत नाही पोषण आहार!
चांडोळ (जि. बुलडाणा): साधारणत: १२ दिवसांपासून चांडोळ (ता. बुलडाणा) या गावातील अंगणवाडीमधून मुलांना पोषण आहार देणे बंद असल्याने या गावातील अंगणवाड्या केवळ नावापुरत्या उरल्या आहेत, अशी तक्रारी ग्रामस्थांनी २ फेब्रुवारी केली.
चांडोळ येथे एकूण आठ अंगणवाड्या सुरू आहेत. गावातील शून्य ते सहा वर्षांंंपर्यंंतच्या बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण मिळावे आणि त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा, या उद्देशाने प्रत्येक अंगणवाडीवर एक सेविका व एक मदतनीस कार्यरत आहे.
सकाळी ७ ते १0 या वेळेत चालणार्या अंगणवाडी केंद्रातून मुलांना संस्कार, शिक्षण, शारीरिक विकासासाठी दैनंदिन आहार देण्यात येतो; मात्र गेल्या १२ दिवसांपासून या ठिकाणी अंगणवाडी केंद्रात मुलांना दैनंदिन पोषण आहारच देणे बंद करण्यात आले आहे.
यासंदर्भात पालक वर्गातून रोष व्यक्त होत असून, अंगणवाडीच्या सावळ्या गोंधळाबाबत वरिष्ठांचे दुर्लक्ष दिसत आहे.
मुळात ग्रामीण भागात चालणार्या अंगणवाडी केंद्रावर वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याने लाभार्थी मुलांना आहारापासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत अंगणवाडी सेविकांशी चर्चा केली असता, त्या म्हणाल्या, आम्हाला वरूनच मालाचा साठा मिळाला नाही. त्यामुळे येथे आहार शिजवण्यात येत नाही. एकूणच अंगणवाडी केंद्रांच्या कारभारावर संबंधित विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे.