अमडापूर ते मेडसिंगा रस्त्याचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:47 IST2021-02-26T04:47:59+5:302021-02-26T04:47:59+5:30
अमडापूर लगत मेडसिंगा, धोत्रा नाईक, किन्ही नाईकसह काही छोटी गावे आहेत. मात्र या गावांना जाण्यासाठी अजूनपर्यंत चांगला ...

अमडापूर ते मेडसिंगा रस्त्याचे काम पाडले बंद
अमडापूर लगत मेडसिंगा, धोत्रा नाईक, किन्ही नाईकसह काही छोटी गावे आहेत. मात्र या गावांना जाण्यासाठी अजूनपर्यंत चांगला रस्ता नसल्याने या गावांना कोणत्याही प्रकारचे वाहन जाऊ शकत नव्हते. शासनाची कुठलीही बस जात नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही येथे बस येत नव्हती. प्रकरणी मेडसिंगा येथील सरपंचांनी अनेक वेळा शासनाकडे रस्ता व बसची मागणी केली. यामुळे गावात जाण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून २ कोटी ५१ हजार रुपये किमतीचा रस्ता मंजूर केला. त्या रस्त्याचे खडीकरण होऊन, आता डांबरीकरणाचे काम ठेकेदाराकडून दिवस व रात्री करण्यात येत होते. मात्र रस्त्याचा योग्य दर्जा राखल्या जात नव्हता. याबाबत संबंधितांना कल्पना देऊनही त्यास फरक पडला नाही. प्रकरणी अमडापूर येथील शेतकरी व स्थानिकांनी याची माहिती अकोला बियाणे महामंडळ संचालक वल्लभराव देशमुख यांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली तेव्हा रस्त्याच्या दर्जाबाबत त्यांना शंका आल्या. या कामाची नंतर संजय गवई, ग्रामपंचायत सदस्य दिलीप देशमुख, शिवाजी गायकवाड, प्रकाश खराडे यांनीही पाहणी केली व दर्जेदार रस्त्याची मागणी करत हे काम बंद पाडले.