पार्डी येथे दारु विक्री विरुद्ध महिलांचा एल्गार!

By Admin | Updated: April 12, 2017 00:52 IST2017-04-12T00:52:18+5:302017-04-12T00:52:18+5:30

जानेफळ- तत्काळ अवैध दारु विक्री तसेच गावरान दारु बंद करण्यात यावी, यासाठी पार्डी ता.मेहकर येथील महिलांनी एल्गार पुकारुन जानेफळ पोलीस स्टेशनला निवेदन दिले.

Allegations against alcohol sales in Pardi | पार्डी येथे दारु विक्री विरुद्ध महिलांचा एल्गार!

पार्डी येथे दारु विक्री विरुद्ध महिलांचा एल्गार!

अवैध दारू विक्री वाढली : उपोषणाचा इशारा
जानेफळ : वाढती अवैध दारु विक्री तसेच गावरान दारु विक्रीमुळे दारु पिणाऱ्यांची संख्या वाढून गावातील वातावरण दूषित होत कुटुंबातसुद्धा वाद-विवाद होत असल्याने महिला व नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे तत्काळ अवैध दारु विक्री तसेच गावरान दारु बंद करण्यात यावी, यासाठी पार्डी ता.मेहकर येथील महिलांनी एल्गार पुकारुन जानेफळ पोलीस स्टेशनला पोहोचत लेखी निवेदन दिले आहे.
न्यायालयाच्या आदेशाने गावातील दारुची दुकाने पूर्णत: बंद असल्याने आता दारुड्यांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना त्या उलट चित्र सध्या जानेफळ परिसरात पहावयास मिळत आहे. त्यामुळेच अवैध दारु विक्री सुरु असल्याचे यातून स्पष्ट होत आहे; मात्र उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या छुप्या आशीर्वादानेच हे सर्व सुरु असल्याचे उघड होत आहे. पार्डी तालुका मेहकर येथील शंभरच्या जवळपास महिलांनी थेट जानेफळ पोलीस स्टेशनला पोहोचून तत्काळ अवैध तसेच गावरान दारु बंद करा, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराच दिला आहे. यावेळी ज्योती सुभाष व्यवहारे, कल्पना प्रभु बोरकर, गीता वसंता व्यवहारे, अनिता ज्ञानेश्वर वोढे, यमुना वामन बोरकर, अंजना उकंडा वाथे, लता प्रकाश शिंदे यांच्यासह जवळपास १०० महिलांची उपस्थिती होती.

ढालसावंगी येथे दारूचा महापूर; पोलीस प्रशासनाला महिलांचे निवेदन
ढालसावंगी : येथील परिसरात अनेक ठिकाणी अवैध गावठी दारूची विक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे गावातील शांतता सुव्यवस्था धोक्यात येत असल्यामुळे दारू बंद करण्यासाठी महिलांनी पोलीस प्रशासनाकडे १० एप्रिल रोजी धाव घेतली. बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी येथे मागिल अनेक दिवसांपासून १३ ते १४ व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू पाडतात. दररोज गावात अंदाजे २०० ते २५० लिटर गावठी दारुची विक्री होत असून, यामुळे मोलमजुरी करून पैसे कमविणारे लोक घरात पैसे न देता नशा पाणी करून महिलांना त्रास देत आहेत. परिणाम, घरातील लहान मुलांनाही त्रास होत असून, अनेक व्यक्ती घरातील भांडी, धान्य विकत आहेत. या परिसरात मागील २० ते २५ वर्षापासून दारु प्राशन केल्यामुळे आतापर्यंत ३० ते ३५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील अवैध गावठी दारूची विक्री कायम स्वरूपी बंद करावी, या मागणीसाठी महिला ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेऊन पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. यावेळी मुक्ता नागरे, विमल नरवाडे इंद्रा लहाने, संगीता शिंदे, लक्ष्मी लहाने, लीला बेंडे, राधा हिवाळे, गोधा नरवाडे, रेखा गुळवे, आनंदी पवार, रेखा गायकवाड, नंदा सोनुने, मनिषा भिंगारे, रेखा पाडळे, मीरा खार्डे, साळु शिंदे, पार्वती नरवाडे, शांता मोरे, कस्तुरा हिवाळे, सुशीला गवळी, सुमन नरवाडे, शिवगंगा वाघ आदी महिलांची उपस्थिती होती.

Web Title: Allegations against alcohol sales in Pardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.