भरधाव वाहनाने तिघींना उडवले, मायलेकीचा जागीच मृत्यू
By सदानंद सिरसाट | Updated: November 5, 2023 18:47 IST2023-11-05T18:46:41+5:302023-11-05T18:47:10+5:30
भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मजूर महिलांना उडवल्याने मायलेकीचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव वाहनाने तिघींना उडवले, मायलेकीचा जागीच मृत्यू
जळगाव जामोद (बुलढाणा) : भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मजूर महिलांना उडवल्याने मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. जळगाव जामोद-नांदुरा रोडवरील सूतगिरणीजवळ हा अपघात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.
नांदुऱ्याकडे जाणारी चारचाकी वाहन क्रमांक एमएच-२८, एझेड-३९९७ भरधाव होते. यावेळी काम आटोपून सूतगिरणीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन महिलांना चिरडून वाहन रस्त्याच्या खाली उतरले. त्यामध्ये वैष्णवी महादेव दांडगे (१७), नंदाबाई महादेव दांडगे (५०) या दोन मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेली बेबीबाई लक्ष्मण घोपे (६०) ही महिला गंभीर जखमी झाली आहे.
अपघात होताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आसलगाव येथील वीर हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे उल्हास माहोदे यांनी तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघींना मृत घोषित केले. एका जखमी महिलेवर उपचार चालू आहेत. अपघातग्रस्त गाडी नांदुरा येथील मनोहर मियानी यांची असल्याची माहिती आहे.