मोताळा तालुक्यातील ‘त्या’ चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:56 IST2017-12-29T00:55:29+5:302017-12-29T00:56:12+5:30
मोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी चार जणांना अटक करून पोलीस कोठडी मिळवली होती. दरम्यान, न्यायालयाने मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

मोताळा तालुक्यातील ‘त्या’ चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी चार जणांना अटक करून पोलीस कोठडी मिळवली होती. दरम्यान, न्यायालयाने मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
तालुक्यातील राजूर येथे बीड जिल्ह्यातील एका विवाहितेचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला होता. त्यापूर्वी तिचे परराज्यात गर्भलिंग निदान करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वैद्यकीय अर्हता नसलेल्या ब्रिजलाल सुपडा चव्हाण (५0 रा. गुळभेली, ता. मोताळा), डॉ. सैय्यद आबिद हुसेन सैय्यद नजीर (४९, रा. बुलडाणा), गर्भपात करणारी विवाहिता व तिचा पती किशोर सुदामराव चाळक (२९, रा. किनगाव ता. गेवराई, जि. बीड) या चार जणांना अटक केली होती. सुरुवातीला त्यांना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास बोराखेडीचे पोलीस निरीक्षक अविनाश भामरे करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे हे परराज्यातही पसरले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत बुलडाणा जिल्हय़ात गर्भपातासंदर्भातील तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा गर्भपातासंदर्भात संवेदनशील बनला असल्याचे चित्र दिसून येत आहे.