सर्वच बँकांच्या ‘एटीएम’मध्ये ठणठणाट!

By Admin | Updated: April 10, 2017 00:15 IST2017-04-10T00:15:03+5:302017-04-10T00:15:03+5:30

बुलडाणा : मागील एका आठवड्यापासून एमटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. भरउन्हात नागरिकांना पैसे काढण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

All banks' ATMs stalled! | सर्वच बँकांच्या ‘एटीएम’मध्ये ठणठणाट!

सर्वच बँकांच्या ‘एटीएम’मध्ये ठणठणाट!

आठवडी बाजारावर परिणाम : भरउन्हात नागरिकांची भटकंती

बुलडाणा : मागील एका आठवड्यापासून एमटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे दैनदिन व्यवहारावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, भरउन्हात नागरिकांना पैसे काढण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्याचा परिणाम रविवार, ९ एप्रिल रोजी आठवडी बाजारावर दिसून आला. अनेकांनी पैसे नसल्यामुळे अत्यावश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यावर भर दिल्याचे दिसून आले.
मागील एका आठवड्यापासून शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या १६ एटीएममध्ये रोकड नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच शनिवार व रविवार अशा सलग आलेल्या दोन दिवसीय सुट्यामुळे तसेच काही तासांसाठी सुरू असलेले खासगी बँकेचे एटीएम केंद्रातील रोकड संपल्याने ग्राहकांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून रोकड टाकण्याबाबत असलेल्या उदासीनतेमुळे ग्राहकांचे व्यवहार खोळंबले आहेत.
मागील एका आठवड्यापासून प्रत्येक बँकेत मोठ्या रांगा दिसून येत आहेत. त्यातही काही बँकांनी पैसे काढण्याची मर्यादा दिली आहे. त्यातच शनिवारी व रविवारी आलेल्या सुट्यांचा ग्राहकांना मोठा फटका बसला आह़े जवळपास सर्व बँकांमधील एटीएममध्ये रोकड नसल्याने ग्राहकांच्या संतापात अधिक भर पडली़

आॅनलाइन व्यवहारांसाठी दोन टक्के जादा भुर्दंड
पंतप्रधानांनी आॅनलाइन व्यवहारावर जादा भर दिला असला, तरी शहरात मात्र ग्राहक आॅनलाइन व्यवहार करण्याबाबत नाखूश आहेत़ साध्या औषधी दुकानावर पाचशे रुपयांची औषधी घ्यावयाची म्हटल्यास त्यामागे दोन टक्के अधिकचा जादा चार्ज द्यावा लागतो. हीच गत मोबाइल दुकानांसह अन्य व्यवहारांना लागू पडत आह़े दुकानदारांच्या मते खासगी बँका त्यांच्याकडून या ट्रान्झक्शनसाठी त्यांना रक्कम आकारतात. त्यामुळे त्यांना नाइलाजाने ग्राहकांकडून दोन टक्के चार्ज घ्यावा लागतो़

स्टेट बँक पैसे देत नसल्याची ओरड
बुलडाणा शहर परिसरातील खासगी किंवा राष्ट्रीयीकृत बँकांना स्टेट बँकेकडून रोकड पुरवठा होत असतो. याबाबत अनेक ग्राहकांनी खासगी तसेच इतर राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता स्टेट बँकेकडून रोकड उपलब्ध होत नसल्यामुळे एटीएममध्ये पैसे टाकू शकत नसल्याची प्रतिक्रिया दिली.

Web Title: All banks' ATMs stalled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.