अजिंठा-बुलडाणा राज्य मार्ग कामात गैरव्यवहार!
By Admin | Updated: February 16, 2016 01:10 IST2016-02-16T01:10:53+5:302016-02-16T01:10:53+5:30
लोकायुक्तांच्या निर्देशावरून पाच व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल; ५९ लाखांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार.

अजिंठा-बुलडाणा राज्य मार्ग कामात गैरव्यवहार!
बुलडाणा: मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या आणि जिल्ह्यातून जाणार्या अजिंठा-बुलडाणा राज्य मार्गाच्या कामात ५९ लाखांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत बुलडाण्यातील पत्रकार स्व. पी.पी. कोठारी यांनी केलेल्या तक्रारीवरून लोकायुक्तांच्या निर्देशानुसार या प्रकरणात संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांसह पाच जणांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. अजिंठा- बुलडाणा रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबाबत पत्रकार स्व. पी.पी. कोठारी यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीत नमूद केले होते की, अजिंठा-बुलडाणा राज्य महामार्गाच्या कामात ठेकेदार रेणुका कन्स्ट्रक्शनने जे डांबर आणले, त्याचे बनावट गेटपास शासनास सादर केले. त्यानंतर दक्षता व गुणनियंत्रण विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत ते पासेस कंपनीने दिले नसल्याचे सांगितले. यावरून शासनाकडे बनावट पास सादर करण्यात आल्याचे सिद्ध झाले. सदर कामात कंत्राटदार व संबंधित अधिकार्यांनी संगनमत करून शासनाची एकूण ५९ लाख १५ हजार ८३८ रुपयांची फसवणूक केली. त्यात डांबर प्रकरणात शासनाची ३६ लाख ३३ हजार ४३४ रुपयांची, तर ओव्हरसाईज खडी वापरून २२ लाख ८२ हजार ४0४ रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. या रस्त्याच्या कामाविषयी तक्रार केल्याची माहिती असतानाही विभागीय लेखाधिकारी यांनी ही बाब संबंधितांच्या नजरेस आणून न देता, बिले मंजुरीसाठी सादर केली. कार्यकारी अभियंत्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष करून मोठय़ा आकाराच्या खडी टाकल्यानंतरही कंत्राटदाराचे बिल मंजूर केले. यामध्ये रेणुका कन्स्ट्रक्शन (अजिंठा), शाखा अभियंता बी.बी. नेवारे, उपअभियंता जी.बी. पोहेकर, विभागीय लेखाधिकारी एच.डी. लांजेवार, कार्यकारी अभियंता एम.बी. मोरे हे दोषी आढळले असून, त्यांच्याविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.