बंदीनंतर दारू विक्रीचे ‘मार्ग’ बदलले!
By Admin | Updated: April 18, 2017 01:08 IST2017-04-18T01:08:00+5:302017-04-18T01:08:00+5:30
न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली : जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

बंदीनंतर दारू विक्रीचे ‘मार्ग’ बदलले!
- स्टिंग आॅपरेशन
बुलडाणा : महामार्गावरील व ५०० मीटरच्या परिघातील दारू विक्रीची दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बंद झाली असली, तरी आता गल्लीबोळात आणि जागोजागी अवैधरीत्या दारू विक्री सुरू झालेली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपेरशनमध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने सुरू असलेली दारू विक्री उघड झाली.
महामार्गावर वाढत्या अपघाताला दारू जबाबदार आहे, या संदर्भाची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने गंभीर दखल घेत सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारू विक्री बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ५०० मीटरच्या आत असलेले जिल्ह्यातील ३६१ वाईन शॉप, बीअर बार १ एप्रिलपासून बंद करण्यात आले.
शासनाच्या या निर्णयामुळे नियमित बसणाऱ्यांची मात्र पंचाईत झाली शिवाय दारू व्यावसायिकांनाही तोटा सहन करावा लागत आहे. दारू दुकाने बंद झाल्यानंतर शहरात दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून, काळ्याबाजारात दारू चढ्या भावाने विकली जात आहे. सदर दारू विक्रीची ठिकाणे शोधून काढण्यासाठी ‘लोकमत’च्या पथकाने रविवार, १६ एप्रिल रोजी बुलडाणा व मेहकर शहर व ग्रामीण परिसरात स्टिंग आॅपरेशन केले असता ग्रामीण क्षेत्रातील किराणा दुकान, सुनसान रस्ते, आडोशाला असलेल्या टपऱ्या, मोकळे मैदान तसेच बसस्थानक परिसर व शहरातील विविध वस्त्यांमध्ये दिवसाला व रात्रीच्या वेळी दारूची छुप्या मार्गाने विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. शिवाय बऱ्याच ठिकाणी दारू व गुटख्याची घरपोच सेवा दिली जात असल्याचे उघड झाले.
मेहकर उपविभागात खुलेआम दारू विक्री
मेहकर उपविभागात येणाऱ्या मेहकर, डोणगाव, जानेफळ, लोणार व साखरखेर्डा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही गावामध्ये गावरान हातभट्टीची दारु, देशी तसेच विदेशी दारूची जादा भावाने मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. उपविभागातील सोनाटी, उकाळी-सुकळी, चायगाव, हिवरा आश्रम, कळंबेश्वर, अंजनी खुर्द, सुलतानपूर, अंजनी बु. लोणी गवळी, मोळा, लावणा, शेलगाव देशमुख, आंधृड, चिंचाळा, जनुना, बेलगाव, विश्वी, आरेगाव, घाटबोरी, उमरा देशमुख, उटी, मुंदेफळ, हिवरा खुर्द, लोणी काळे, सावत्रा, वरवंड, मारोती पेठ, माळेगाव, सोनार गव्हाण, घुटी, पार्डी, पाचला, शेंदला, मोळी, पिंप्रीमाळी, वेणी, देऊळगाव माळी, वडाळी, पारखेड, मोहना मांडवा, पाथर्डी, बोथासह आदी गावांमध्ये गावरान, देशी दारूची अवैध विक्रीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार दारुची विक्री बंद आहे. तसेच नियमापेक्षा जादा दराने दारु विक्री करु नये, मात्र जर कोणी जादा दराने दारु विक्री करीत असेल, तर त्यांचेवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
- जी.आर. गावंडे, दारुबंदी अधिकारी उपविभाग, मेहकर