अखेर धृपतराव सावळे भाजपात
By Admin | Updated: August 21, 2015 23:38 IST2015-08-21T23:38:55+5:302015-08-21T23:38:55+5:30
मुंबईच्या प्रदेश कार्यालयात पार पडला प्रवेश सोहळा.

अखेर धृपतराव सावळे भाजपात
बुलडाणा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार धृपतराव सावळे आणि काँग्रेस सनियंत्रण समितीचे माजी सरचिटणीस विश्वनाथ माळी यांनी २१ ऑगस्ट रोजी अखेर मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्यासोबत ११ कार्यकर्तेही भाजपवासी झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून धृपतराव सावळे व विश्वनाथ माळी हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. अनेकदा प्रवेशाचा मुहूर्तही ठरला; मात्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तारखा मिळत नसल्याने पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सावळे एक मुरब्बी व जनाधार असलेला नेता म्हणून परिचित आहेत. सरपंच ते आमदार व्हाया जिल्हा परिषद अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली. मागील निवडणुकीत धृपतराव सावळे हे चिखली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटवर निवडणूक लढले होते. मोताळा कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील, बिरसिंगपूरचे माजी सरपंच रामदास मुळे, उद्योजक रूपराव उबाळे, कॉग्रेस किसान सेलचे माजी तालुकाध्यक्ष कोलवडचे बबन पाटील, पंडितराव सपकाळ तसेच गिरडा येथील कुंदन गायकवाड, विनोद पोफळे, अशोक गायकवाड यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश घेतला.