अखेर आदिवासी वृद्ध कुटुंबप्रमुखाचाही मृत्यू
By Admin | Updated: May 16, 2016 01:24 IST2016-05-16T01:24:56+5:302016-05-16T01:24:56+5:30
मालठाणा येथील सामूहिक आत्महत्या प्रकरण; चार दिवसांपासून सुरू होती मृत्यूशी झुंज.

अखेर आदिवासी वृद्ध कुटुंबप्रमुखाचाही मृत्यू
संग्रामपूर (जि. बुलडाणा): संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मालठाणा गावातील आदिवासी पावरा समाजातील एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ११ मे च्या रात्री सामूहिक विष प्राशन केले होते. यामध्ये या कुटुंबातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर ८0 वर्षीय नानसिंग सित्तु मसाने या कुटुंबप्रमुख वृद्धाला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचाराकरिता अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा अखेर १५ मे रोजी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दुपारी १ वाजेदरम्यान मृत्यू झाला आहे. मालठाणा या आदिवासी गावातील पावरा समाजातील नानसिंग सित्तु मसाने (वय ८0), सून लक्ष्मी भावसिंग मसाने, नातू सुरेश भावसिंग मसाने आणि मुलगा दिनेश नानसिंग मसाने या एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी रात्री ७ वाजेदरम्यान सामूहिक विष प्राशन केले होते. यामध्ये ११ मे च्या रात्री जळगाव जामोद येथील रुग्णालयात दिनेश नानसिंग मसाने (वय ३५) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात लक्ष्मी भावसिंग मसाने, आणि सुरेश भावसिंग मसाने या माय-लेकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नानसिंग मसाने या वृद्ध कुटुंब प्रमुखाची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले होते. चार दिवसांपासून नानसिंग सित्तु मसाने यांच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते ते उपचाराला चांगला प्रतिसादही देत होते त्यांच्या या आत्महत्येच्या प्रयत्नाचे बयाणही जळगाव जामोद पोलिसांनी १२ मे रोजी घेतले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाल्या होत्या. मात्र त्यांना १५ मेच्या दुपारी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी अकोला येथील शासकीय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे मसाने कुटुंबावर आणखी एक नियतीने आघात केला असून संपूर्ण मालठाणा गावावर या घटनेमुळे दुख:चा डोंगर पसरला आहे.