शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ‘उन्नत’ अभियान - भाऊसाहेब फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:10 IST2017-04-10T00:10:00+5:302017-04-10T00:10:00+5:30
शेगावात राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प खारपाणपट्ट्यात राबविणार!

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ‘उन्नत’ अभियान - भाऊसाहेब फुंडकर
शेगाव : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यावर शासनाचा भर आहे. उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाची सुरुवात राज्यात केली असून, या अभियानाच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता २०२२ पर्यंत दुपटीने वाढविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.
शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर आ.डॉ.संजय कुटे, आ.आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, विस्तार व प्रशिक्षण संचालक एस.एल. जाधव, नियोजन व कृषी प्रक्रिया संचालक पी.आर. ठोकळ, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक पी.जी. इंगोले, संशोधन संचालक डी.एम. मानकर, विभागीय कृषी सहसंचालक शिवराज सरदार, विजय घावटे, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे आदी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर राज्यात जलसंधारणाची कामे होत असल्याचे सांगत कृषिमंत्री म्हणाले, खामगाव तालुक्यात तोरणा नदीवर २१ बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी उन्हाळी पिके घेत आहते, असेच चित्र राज्यात आहे. शेतकऱ्यांच्या बचत गटाला अनुदानावर छोटा टॅ्रक्टर साहित्यासह देण्यात येणार आहे. सदर शेतकरी गट या टॅ्रक्टरला भाड्याने देऊन उत्पन्न मिळवू शकणार आहे. कृषिमध्ये यांत्रिकीकरण, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २०२२ पर्यंत दुपटीने उत्पादन वाढ, कृषीपुरक व्यवसाय निर्माण करणे, कृषी योजनांमध्ये सुसूत्रता व सुधारणा करणे, दोन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आदी कार्यक्रम या ‘उन्नत शेती - समृद्ध शेतकरी’ अभियानातून राबविण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले, कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी कृषी सहायक, कृषी सेवक या गावपातळीवरील घटकावर अवलंबून आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांप्रती मानवतेच्या दृष्टिकोनातून वागले पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणायचे असतील, तर कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. जिल्ह्यात सीताफळ लागवडीचा १००० हेक्टरवर प्रयोग करण्यात येणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. प्रलंबित असलेल्या कृषीपंप वीज जोडण्या दोन वर्षांत या शासनाने पूर्ण केल्या आहेत. आता २०१७-१८ मध्ये मागेल त्याला कृषी पंप, वीज जोडणी देण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब मिशन राज्यात राबविण्यात येणार आहे. तसेच ठिबक सिंचनासाठी अर्ज करण्यास एक महिना कालावधीची मर्यादा रद्द करुन ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. नानाजी देशमुख कषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खारपाणपट्ट्यातील एक हजार गावांमध्ये जलसंधारण व कृषी विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच हवामानाचा अंदाज मिळण्यासाठी राज्यात दोन हजार ठिकाणी महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. आभार प्रकल्प संचालक (आत्मा) एन.एम. नाईक यांनी मानले.
‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाचे माहिती पत्रक, घडी पुस्तिकेचे विमोचन
४याप्रसंगी ‘उन्नत शेती- समृद्ध शेतकरी’ अभियानाचे माहिती पत्रक, घडी पुस्तिका यांचे विमोचन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ.डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, धृपदराव सावळे यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले. कृषी विभागातील विस्तार व प्रशिक्षण संचालक एस.एल. जाधव, शास्त्रज्ञ सी.पी. जायभाये, कृषी प्रक्रिया पी.एन. पोकळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित होते.