महसूल वसुलीसाठी प्रशासनाचा आटापिटा!
By Admin | Updated: March 22, 2017 03:03 IST2017-03-22T03:03:04+5:302017-03-22T03:03:04+5:30
७१ टक्के वसुली; निर्धारित उद्दिष्टपूर्तीसाठी उरले ११ दिवस.

महसूल वसुलीसाठी प्रशासनाचा आटापिटा!
वाशिम, दि.२१- जिल्ह्याचे महसूल वसुलीचे निर्धारित ४३ कोटी ५१ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाचा आटापिटा सुरू आहे. तथापि, २0 मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाला ३0 कोटी ९१ लाख ९९ हजार म्हणजेच केवळ ७१ टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले आहे. आता उर्वरित १0 दिवसांत त्यांना महसूल वसुलीचे काम वेगाने करावे लागणार आहे.
शासनाच्यावतीने यंदा वाशिम जिल्ह्यासाठी ४३ कोटी ५१ लाख २४ हजारांचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. यामध्ये प्रपत्र अ गौण खनीज आणि करमणूक कराचा समावेश होता. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांच्या वारंवार बैठका आयोजित करून महसूल वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली. त्यामुळे महसूल वसुलीची कार्यवाही वेगात सुरू झाली, तरी २0 मार्चपर्यंत जिल्ह्याची महसूल वसुली ३0 कोटी ९१ लाख ९९ हजारापर्यंतच होऊ शकली आहे. त्यामध्ये वाशिम उपविभागातील वाशिम तालुक्यात निर्धारित १0 कोटी ५४ लाखांपैकी ९ कोटी ६५ लाख २१, मालेगाव तालुक्यात निर्धारित ५ कोटी ४७ लाखांपैकी २ कोटी ३४ लाख ३८ हजार, रिसोड तालुक्यात निर्धारित ६ कोटी ३३ लाखांपैकी ४ कोटी १८ लाख २ हजार, असे तीन तालुके मिळून एकूण २२ कोटी ३४ लाखांच्या निर्धारित उद्दिष्टापैकी १६ कोटी १७ लाख ७९ हजारांची वसुली केली. तर कारंजा उपविभागातील मंगरुळपीर तालुक्यात निर्धारित ६ कोटी २९ लाखांच्या उद्दिष्टापैकी ४ कोटी ४0 लाख ८४ हजार, मानोरा तालुक्यात ५ कोटी ४१ लाखाच्या उद्दिष्टापैकी १ कोटी ४६ लाख ३१ हजार आणि कारंजा तालुक्यात ९ कोटी ४७ लाखांच्या उद्दिष्टापैकी ८ कोटी २ लाख ८३ हजारांची वसुली झाली आहे. त्याशिवाय खणीकर्म विभागाकडील २ कोटी ३0 लाख ५३ हजारांची वसुली मिळून जिल्हा प्रशासनाला केवळ ३0 कोटी ९१ लाख ९९ हजार अशी ७१.0६ टक्के वसुली करणे शक्य झाले आहे. उर्वरित १२ कोटी ५९ लाख २५ हजारांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल विभागाला विशेष मोहीम राबविण्यासह कसोशीचे प्रयत्न करावे लागतील.