स्वाइन फ्लू रोखण्यास प्रशासन सज्ज
By Admin | Updated: February 27, 2015 01:21 IST2015-02-27T01:21:16+5:302015-02-27T01:21:16+5:30
बुलडाणा जिल्ह्यात टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा- जिल्हाधिकारी कुरुंदकर.

स्वाइन फ्लू रोखण्यास प्रशासन सज्ज
बुलडाणा : जिल्ह्यात स्वाईन फ्लूने दोन रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली असून, स्वाइन फ्लू आजारावर परिणामकारक ठरणार्या टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. जिल्ह्यात सामान्य रुग्णालय बुलडाणा, शासकीय रुग्णालय खामगाव, उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर व शेगाव येथे रुग्णांच्या तपासणीसाठी केंद्र उघडण्यात आले आहे; तसेच बाधित रुग्णांच्या उपचारासाठी याच चार ठिकाणी आयसोलेशन कक्षही स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती नियोजन समितीच्या दालनामध्ये स्वाइन फ्लू आजाराबाबत आयोजित बैठकीत देण्यात आली. जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हिवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. कसबे, शिक्षणाधिकारी श्रीमती वैशाली ठग व तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. तालुका मुख्यालयात काही मेडिकल स्टोअर्समध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगीने टॅमी फ्लू गोळ्या ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याचे सूचित करीत जिल्हाधिकारी म्हणाले की, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्ण तपासताना मास्क वापरण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना मुलांमध्ये या आजाराची लक्षणे किंवा ताप दिसल्यास त्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखविण्याचे पालकांना सांगावे; तसेच त्यांना स्वाइन फ्लूबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. स्वाइन फ्लूला कारणीभूत असणारा विषाणू एच १ एन १ चा प्रसार नियंत्रणात येत असल्याचे सांगितले. सद्यस्थितीत तापमान वाढत असल्यामुळे या विषाणूचा प्रसार नियंत्रणात येणार आहे. संशयीत रुग्णाचे थ्रोट स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठवून २४ तासाच्या आत निदान केल्या जात आहे.