समायोजन स्थगीती आदेशामुळे प्रशासन गोंधळात
By Admin | Updated: August 9, 2014 00:05 IST2014-08-08T23:39:39+5:302014-08-09T00:05:30+5:30
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षक समायोजन प्रक्रियेला स्थगीती आदेशामुळे जिल्हा परिषद प्रशासन गोंधळात.

समायोजन स्थगीती आदेशामुळे प्रशासन गोंधळात
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शिक्षक समायोजन प्रक्रियेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या स्थगीती आदेशामुळे जिल्हा परिषद प्रशासन गोंधळात पडले आहे. गेल्या दोन दिवसापासून प्रशासनातील अधिकारी व जिल्हा परिषदेचे वकिल यांनी या स्थगीती आदेशावर बराच खल केल्या नंतर आता पुन्हा नव्याने समायोजनची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलतांना सांगीतले.
जिल्हा परिषदेमधील उच्च प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया ५ ऑगस्ट पासून सुरू झाली. मात्र या प्रक्रियेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेने यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ६ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निकाल दिला. हा निकाल ग्राह्य धरून जिल्हा परिषदेने लगेच समायोजनाची प्रक्रिया थांबविली. मात्र या निकालाचा शब्दश: नेमका अर्थ काय निघतो याची कोणतीही शाहनिशा न करताच प्रक्रियेला दिलेली स्थगीती चुकीची आहे असा वाद सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व वकीलांकडून या निकाल पत्रावर बराच खल केल्या गेला. ह्ययादी तयार करण्यास हरकत नाही. मात्र न्यायालयाच्या पुढील आदेशा पर्यंत आदेश देवू नकाह्ण असे या आदेशात म्हटले आहे. असे असताना जिल्हा परिषदेने समायोजन प्रक्रियेला दिलेली स्थगीती योग्य नसल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आल्या नंतर आता समायोजनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी समायोजनाची उर्वरीत प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगीतले.