वर्षभरात २५ वाहनांवर कारवाई!
By Admin | Updated: May 25, 2017 00:51 IST2017-05-25T00:51:40+5:302017-05-25T00:51:40+5:30
विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्यांकडून ४ लाख २५ हजाराचा दंड वसूल

वर्षभरात २५ वाहनांवर कारवाई!
संग्रामपूर : तालुक्यामधील नदी पात्रामधून विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गत वर्षात संग्रामपूर तहसील कार्यालयामार्फत २५ कारवाया करण्यात आल्या आहेत. या झालेल्या कारवायांमधून ४ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे.
संग्रामपूर तालुक्यामधून वान नदी तसेच पूर्णा नदी वाहते. या नदीपात्रांमध्ये पावसाळा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाळू असते. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर तसेच शेगाव तालुक्यामधील रेती माफीया हे मोठ्या प्रमाणात विना परवाना रेतीची वाहतूक करीत असतात.
अशा वाहनधारकांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एका वर्षामध्ये विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर तसेच ट्रकद्वारे रेतीची वाहतूक करणाऱ्यावर संग्रामपूर तहसील कार्यालयामार्फत २५ कारवाया करण्यात आल्या आहेत; मात्र तरीही मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीतही अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुक्यातील व बाळापूर तालुक्यातील रेती माफीया मोठ्या प्रमाणात विना परवाना रेतीची वाहतूक करीतच आहेत.
तहसीलकडे वाहन नसल्यामुळे रेती चोरीत वाढ!
गत तीन वर्षापासून संग्रामपूर तहसील कार्यालयाची तीन वाहने नादुरुस्त अवस्थेत पडलेले आहे. त्यामुळे तहसीलदारांना विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडण्यासाठी दुचाकीवर नदीपात्रात जावे लागते. रात्री-बेरात्री नदीपात्रात जाण्यासाठी तहसील कार्यालयाला चारचाकी वाहन उपलब्ध नसल्यामुळे याचा फायदा रेती माफीया घेत आहेत. रात्री-बेरात्री तहसीलदारांना दुचाकीवर नदीपात्रामध्ये जाता येत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या वाहनावर कारवाया करता येत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चोरट्यामार्गाने विना परवाना रेतीची वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देवून तहसील कार्यालयास तातडीने वाहन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.