रेती व वीटभट्टी व्यावसायिकांवर कारवाई
By Admin | Updated: March 27, 2015 01:37 IST2015-03-27T01:37:49+5:302015-03-27T01:37:49+5:30
संग्रामपूर तालुक्यातील कारवाई;३ लाख ३४ हजारांचा दंड.

रेती व वीटभट्टी व्यावसायिकांवर कारवाई
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : विनापरवाना रेती वाहतूक व अवैध वीटभट्टय़ा व्यवसाय करणार्यांना ३ लाख ३४ हजार रुपये दंड करण्यात आल्याची धडक कारवाई संग्रामपूरचे तहसीलदार डॉ. सचिन खल्ल्याळ यांनी २६ मार्च रोजी केली. तालुक्यात मोठय़ा प्रमाणात विनापरवाना रेतीचे उत्खनन होत असल्याने तसेच अवैध वीटभट्टय़ा चालत असल्याने शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत आहे. तसेच वीटभट्टय़ांवर चिमण्या नसल्याकारणाने प्रदूषणसुद्धा होत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांच्या निर्देशानुसार वीटभट्टय़ाचा सर्व्हे करण्यात आला असताना सदर मालकाकडे परवाना नसल्याकारणाने १७ वीटभट्टी मालकांना २ लाख ५५ हजार रुपये दंड करण्यात आला. यामध्ये सोनाळा महसूल मंडळातील ५ जणांविरुद्ध, पातुर्डा मंडळातील ४, कवठळ मंडळातील १ तसेच बावनबीर मंडळातील ७ जणांकडून हा दंड वसूल करण्यात आला. तसेच वाण व पूर्णा नदीपात्रात हर्रास न झालेल्या घाटातून मोठय़ा प्रमाणात होत असलेली रेतीची तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार सचिन खल्ल्याळ यांनी रात्रभर जागे राहून मिशन राबविले. यात सात वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ८0 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रत्येकी १0 हजार २५0 रुपये प्रमाणे दंडाची वसुली करण्यात आल्याचे तहसीलदार खल्ल्याळ यांनी सांगितले. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. विनापरवाना रेती वाहतूक रोखण्यासाठी काही वाहनांची आरटीओ नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहितीसुद्धा तहसील कार्यालयातून देण्यात आली.