कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन ऑडिटच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 11:40 IST2021-04-25T11:40:47+5:302021-04-25T11:40:55+5:30
Oxygen audits at Covid Hospital : मेडिकल ऑडिट आणि प्लांट उभारणीसंदर्भातील गुणवत्ता या दोन्ही बाबींचे हे ऑडिट होणार आहे.

कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन ऑडिटच्या हालचालींना वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ऑक्सिजनचा तुटवडा आणि नाशिकमधील ऑक्सिजन प्लांटला गळती लागल्याने झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा येथील ऑक्सिजन प्लांटचेही येत्या दोन ते तीन दिवसांत ऑडिट करण्यात येणार आहे. यामध्ये मेडिकल ऑडिट आणि प्लांट उभारणीसंदर्भातील गुणवत्ता या दोन्ही बाबींचे हे ऑडिट होणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हे ऑडिट करण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी लवकरच एक आदेश काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रामुख्याने ऑक्सिजनची गळती, रुग्णांना तो देताना त्याचा दाब व दुर्घटना टाळण्यासाठी प्लांट उभारताना योग्य काळजी घेतली आहे किंवा नाही, याची यात प्रामुख्याने पाहणी होणार आहे. यासंदर्भात महसूल यंत्रणा आणि आरोग्य विभागाने २३ एप्रिल रोजी एका बैठकीत सविस्तर चर्चा केली असून, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनीही कोविड समर्पित रुग्णालयातील डॉक्टरांशी याबाबत एका छोटेखानी बैठकीत माहिती घेतली.
दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून ऑक्सिजन उपलब्धतेसंदर्भातच अडचणी असल्याने अनुषंगिक पावले उचलली गेली नव्हती. मात्र, जिल्ह्याला आता जवळपास दहा केएल ऑक्सिजन उपलब्ध झाला असून, आगामी पाच दिवसांची चिंता तूर्तास तरी मिटली आहे. २३ एप्रिल रोजी ५.३ केएल आणि २४ एप्रिल रोजी ६ केएल ऑक्सिजन जिल्ह्यास उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, ऑक्सिजनचे वैद्यकीय ऑडिट करताना रुग्णांना ऑक्सिजन देताना तो योग्य पद्धतीने दिला जातो किंवा नाही, त्यात सुसूत्रता आहे किंवा नाही, अशा बाबींचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. साधारणत: सरासरी ३० लिटर प्रती मिनिट या दाबाने हा ऑक्सिजन रुग्णांना देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करून ऑक्सिजन गळती व त्याचा अपव्यय टाळण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे यासंदर्भातील नोडल अधिकार यांनी सांगितले. आयसीयूमधील ऑक्सिजनवरील रुग्ण व आयसीयूबाहेरील ऑक्सिजनवरील रुग्ण यांना नेमका किती दाबाने ऑक्सिजन द्यावा, यासंदर्भातील सुसूत्रताही आणण्याचा प्रशासकीय यंत्रणेचा प्रयत्न आहे.