मेडीकल्ससह रेडीमेड कपडे विक्रीचे दुकान फोडले, देऊळघाट येथील घटना
By भगवान वानखेडे | Updated: September 12, 2022 14:42 IST2022-09-12T14:41:46+5:302022-09-12T14:42:19+5:30
महिलांचे रेडीमेड कपडे विक्रीचे दुकान फोडून चोरट्याने ५४ हजाराचे साहित्य लंपास केले.

मेडीकल्ससह रेडीमेड कपडे विक्रीचे दुकान फोडले, देऊळघाट येथील घटना
बुलढाणा :
महिलांचे रेडीमेड कपडे विक्रीचे दुकान फोडून चोरट्याने ५४ हजाराचे साहित्य लंपास केले. ऐवढेच नव्हे तर त्याच रात्री औषध विक्रीचे दुकान फोडून २ हजार ५०० रुपये रोख आणि एलइडी टीव्ही लंपास केला. ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गंत येणाऱ्या देऊळघाट येथे १० सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल कलीम अब्दुल मजीद (३२) यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, १० सप्टेंबरच्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने रेडीमेड कपडे विक्रीचे दुकान फोडून दुकानातील ५४ हजाराचे कपडे चोरुन नेले. तर याच दरम्यान गावातीलच भाजीमंडी चौकातील अभिलाश जैस्वाल यांचे औषध विक्रीचे दुकान फोडून रोख २ हजार ५०० तर एक एलइडी टीव्ही चोरुन नेला. अशा तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पावसाचा, अंधाराचा घेतला चोरट्याने फायदा
१० सप्टेंबर रात्री देऊळघाट परिसरात जोरदार पाऊस झाला. अशातच वीजपुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र अंधार होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांने चोरी करुन पोबारा केला असल्याचे तक्रारीत नमुद असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.